हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे युवकाच्या आत्महत्येनंतर मराठा समाज आक्रमक

नांदेड(प्रतिनिधी)-कामारी ता.हिमायतनगर येथील एका युवकाने आत्महत्या केल्यानंतर सकल मराठा समाजाने हिमायतनगर पुर्ण पणे बंद ठेवले असून रस्त्यावर टायर जाळून शासनाचा निषेध केला आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे आदी घटनास्थळी हजर आहेत.
सकल मराठा समाजाने 17 सप्टेंबर रोजी कामारी ता.हिमायतनगर येथे सुदर्शन ज्ञानेश्र्वर देवराये या युवकाने मराठा आरक्षणास होत असलेल्या विलंबाचा निषेध करत आत्महत्या केल्याचे निवेदन आज सकल मराठा समाजाने पोलीस ठाणे हिमायतनगर येथे दिले आहे. 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास सुदर्शन देवराय याने गळफास घेवून आपली जीवन यात्रा संपली आहे. या निवेदनात तात्काळ मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा. तसेच देवराये कुटूंबियांना 50 लक्ष रुपयांची मदत द्यावी, मयताच्या पत्नीस शासकीय सेवेत घ्यावे, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी मयताच्या आपत्यांचे पदवीपयर्र्ंतचे शिक्षण सुंपर्ण करून देण्याची जबाबदारी घ्यावी. आमदार-खासदार यांच्या राखीव निधीतून देवराये कुटूंबियांना जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी. देवराये कुटूंबाचा घरकुल योजनेमध्ये समावेश करावा असे नमुद आहे.

काल सायंकाळी झालेल्या या आत्महत्येचे पडसाद आज सकाळी हिमायतनगर-भोकर राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून सकल मराठा समाजाने दाखवले. संपूर्ण हिमायतनगर शहर बंद आहे. सुदर्शन ज्ञानेश्र्वर देवराये याने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी आपले जीवन संपवल्यामुळे या घटनेला महत्व आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सहाय्यक पोलीस अधिक्षक गौहर हसन, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, हिमायतनगरचे पोलीस निरिक्षक दिरप्पा भुसनुर आदी हिमायतनगर येथे पोहचले आहेत. ते आंदोलकांशी चर्चा करत आहेत. सध्या तरी हिमायतनगर येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. या प्रकरणी पोलीसांनी सुदर्शन ज्ञानेश्र्वर देवराये यांच्या मृत्यूसंदर्भाने आकस्मात मृत्यू दाखल केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *