नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील 63 शाखांमध्ये झालेल्या एटीएम घोटाळ्याची चौकशी करून त्यावर कार्यवाही व्हावी यासाठी दलितमित्र विजयदादा सोनवणे आणि इतर कार्यकर्त्यांनी लातूर येथील विभागीय सहनिबंधक एस.आर.नाईकवाडी यांना दिलेल्या निवेदनानंतर नाईकवाडी यांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था(लेखा परिक्षण) औरंगाबाद यांना पत्र दिले असून त्यात नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 63 शाखांमध्ये असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची कसुन चौकशी करण्याचे पत्र दिले आहे.
रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा दलितमित्र विजयदादा सोनवणे, महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा नांदेड जिल्हा निरिक्षक रिपाई नेते लातूर येथील चंद्रकांत चिकटे, रिपाई नेते लातूर अशोक कांबळे, नांदेड जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर, नांदेड जिल्हा सरचिटणीस संजय भालेराव, महानगर सरचिटणीस प्रतिक सोनवणे आणि जिल्हा कार्याध्यक्ष सचिन सांगवीकर आदींनी मिळून विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूरचे एस.आर.नाईकवाडी यांना हे निवेदन दिले.
या निवेदनाप्रमाणे सौ.निशा विजय सोनवणे यांच्या बॅंक खात्यातून 19 हजार 800 रुपये काढून घेण्यात आले. ते सुध्दा खोट्या एटीएमच्या आधारावर, त्यानंतर विजय दादा सोनवणे यांनी या प्रकरणाला लावून धरले आहे आणि 63 डी.सी.बी. बॅंकेच्या शाखांमध्ये एटीएमचा झालेला घोळ शोधून काढण्यासाठी ते अनेक अधिकाऱ्यांकडे जात आहेत. विभागीय सहनिबंधकांना दिलेल्या निवेदनात बॅंकेतील डिजिटल सायबर प्रणालीचे फॉरेन्सिक ऑडीट व्हावे. शेतकऱ्यांच्या नावाचे खोटे एटीएम बनवून शासनाला आणि शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा चुना लावणारे हे भामटे शोधून त्यांच्यावर कार्यवाही व्हावी अशी मागणी आहे.
या पत्राच्या अनुशंगाने एस.आर.नाईकवाडी यांनी 20 सप्टेंबर रोजी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था(लेखा परिक्षण) औरंगाबाद यांना पत्र पाठविले असून या पत्राच्या अनुषंगाने विजयदादा सोनवणे यांनी दिलेल्या प्रत्येक मुद्याबाबत चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल या कार्यालयास तात्काळ सादर करावा असे आदेश दिले आहेत. यावरुन आता नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमध्ये 63 शाखांमधील प्रत्येक एटीएमची चौकशी होईल आणि दोषींवर कार्यवाही होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे डिजिटल ऑडीट होणार