नांदेड(प्रतिनिधी)-मरकजी मिलाद कमिटीने यंदाची ईद-ए-मिलादुन्नबीची नांदेड शहरात निघणारी मिरवणूक 28 सप्टेंबर ऐवजी 1 ऑक्टोबर 2023 रोजी काढणार असल्याचे जाहीर केले आहे. दोन सण एकाच दिवशी येत असल्याने मरकस मिलाद कमिटीने हा निर्णय घेतलेला आहे.
20 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या नेतृत्वात अनेक सुन्नी धर्मगुरू आणि मरकजी मिलाद कमिटीचे अध्यक्ष व सदस्य यांची एक बैठक झाली. दि.28 सप्टेंबर रोजीच ईद-ए-मिलादुन्नबी हा सण साजरा होणार आहे. त्याच दिवशी गणेश विसर्जन सुध्दा होणार आहे. दोन्ही मिरवणुकांचे मार्ग जवळपास एकाच रस्त्यावर आहेत. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने अनेकदा सुन्नी धर्मगुरुंसोबत बैठका घेतल्या आणि दोन्ही मिरवणूका एकाच दिवशी येत असल्याने त्यात काही तरी बदल मरकजी मिलाद कमिटीने करावा अशा सुचना केल्या होत्या. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून या समन्वयाचे कामकाज अनेक दिवसांपासुन सुरू होते.
काल झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड महेश वडदकर, शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, तहसीलदार संजय वारकड यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते. मुस्लिम धर्मगुरूंमध्ये हजरत मुफ्ती तुराबोद्दीन रझवी, हजरत मुफ्ती मुर्तूजा मिसवाही, हजरत मनशाद आलम, मौलाना सादीक आणि इतर सुन्नी धर्मगुरू उपस्थित होते. मरकजी मिलाद कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद रफिक अशरफीवाला, उपाध्यक्ष सुफी मोहम्मद अली कादरी, सचिव ऍड.आयुबोद्दीन जहांगिरदार, कोषाध्यक्ष हाजी अहेमद शेख नबीवाला यांच्यासह कमिटीतील इतर सदस्य ऍड.सलीम गिगानी, ऍड.सय्यद दाऊद खान, ऍड.शेरअली खान, ऍड.हाजी अहेमद, ऍड.पिर मोहम्मद, पाशाभाई, मिर्झा असद बेग, वाजिद अन्सारी व इतर सदस्य उपस्थित होते.
मरकजी मिलाद कमिटीने प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत 28 सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणूक असल्याने ईद-ए-मिलादुन्नबीची श्रीनगर ते मोहम्मद अली रोड निघणारी मिरवणूक 28 सप्टेंबर ऐवजी 1 ऑक्टोबर 2023 रोजी काढणार असल्याचे जाहीर केले. मरकजी मिलाद कमिटीच्या सकारात्मक प्रतिसादासाठी प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्वागत केले आहे.
श्री गणेशविसर्जनामुळे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक 1 ऑक्टोबर रोजी निघणार ; मरकजी मिलाद कमिटीचा सकारात्मक प्रतिसाद