नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे जनतेला दक्षतेचे आवाहन
नांदेड(प्रतिनिधी)-भारताच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेेने (एनआयए) यांनी देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या 43 गुन्हेगारांची नावे आणि त्यांचे फोटो प्रसिध्द केले आहेत. या संदर्भाने नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, असा कोणताही व्यक्ती दिसला तर त्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षास द्यावी तसेच लॉज आणि हॉटेल चालकांनी प्रत्येक व्यक्तीचा वैध पुरावा पाहिल्याशिवाय त्याला आपल्या येथे आश्रय देवू नये.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ने देश विघातक कृत्य करणारे, कुख्यात, बदमाश आणि गॅंगस्टर यांची माहिती ठेवणे, त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून ती माहिती भारत सरकारला देण्याचे काम एनआयए करत आहे. अशा कुख्यात, बदमाश आणि गॅंगस्टरांची यादी एनआयएने जारी केली आहे. हे आरोपी भारतातील कोणत्याही राज्यात आणि शहरात आश्रय घेण्याची शक्यता आहे. त्यात नांदेड शहर हे जगप्रसिध्द असून देश विदेशातील भाविक नांदेडला येतात. त्यामुळे जिल्ह्यात व शहरात जाहीर केलेले संशयीत गुन्हेगार आश्रय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील व शहरातील हॉटेल, लॉजेस, ढाबे, यात्री निवास, सराय, डेरे, आश्रमशाळा, तसेच भाडेकरूंसाठी खाजगी निवासस्थान पुरवणारे यांच्याकडून आपली ओळख लपवून हे गुन्हेगार आश्रय मिळविण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. त्या करीता आश्रयास येणाऱ्या प्रत्येकाचे आधारकार्ड, मतदानकार्ड, व इतर शासन मान्य ओळखपत्रांची चौकशी आणि शाहनिशाह करून खात्री झाल्यावरच त्याला आश्रय द्यावा. लॉजेस व हॉटेल चालकांनी त्यांच्या राहण्याबाबत आवश्यक त्या सर्व नोंदी रजिस्टरमध्ये ओळखपत्रासह अद्यावत ठेवावी. व त्यांची माहिती संबंधीत पोलीस स्टेशनला द्यावी. जनतेने सुध्दा कोणता संशयीत व्यक्ती पाहिला अथवा संशयीत वस्तु पाहिली तर डायल 112, पोलीस नियंत्रण कक्ष नांदेड येथील दुरध्वनी क्रमांक 02462-234720 या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.
बातमी सोबत एनआयएने जारी केलेली 43 गॅंगस्टरांची यादी जोडली आहे.
