नांदेड(प्रतिनिधी)-गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या.. या गजराने नांदेड शहर दुमदुमले.दहा दिवस श्री गणेशाची आराधना करुन अनेकांनी आज त्यांना निरोप देतांना दाखवलेला उत्साह वाखणण्या जोगा होता. पण बिलोली तालुक्यातील बामणी गावात श्री गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन सख्या बंधूंसह तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. एक माणुस नांदेड शहरातील गोवर्धनघाट जवळ नदी पात्रात बुडाला होता परंतू लोकांनी त्याला वाचवून दवाखान्यात नेले होते परंतू डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आज श्री.गणेश चर्तुदशी श्री गणेशजींना आज निरोप देण्याचा दिवस. आजचा सुर्योदय होण्याअगोदरपासूनच श्री गणेश विसर्जनाची सुरूवात झाली. वाजत-गाजत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या गजराने नांदेड शहर व जिल्हा निनादला. महानगरपालिकेने अनेक भागांमध्ये गणेशमुर्ती संकलन केंद्रे बनविली होती. अनेकांनी त्यातही गणेश मुर्तींना विसर्जित केले. काहींनी स्वत: गोदावरी नदीवर जाऊन श्री गणेशांना गोदावरी नदीपात्रात विसर्जित केले. काही गणेश मंडळांनी वेगवेगळे देखावे तयार केले होते.
शहरभर अनेक ठिकाणी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. पण दुर्देवाने हे पण लिहावे वाटते की, भक्तांनी घेतलेला तो महाप्रसाद थोडासा खाऊन खाली रस्त्यांवर फेकून दिला. वृत्तलिहिपर्यंत गणेश विसर्जन सुरूच होते. श्री.गणेशविसर्जन संपण्यासाठी रात्रीचे 12 वाजतील असा अंदाज आहे.
नांदेड शहरामध्ये गोवर्धनघाट, नगीनाघाट, बंदाघाट, नावघाट, सांगवी नदीवर, पासदगाव नदीकाठावर श्री गणेशविसर्जनाची सोय करण्यात आली होती. महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक घाटावर जिवरक्षक दलाची व्यवस्था आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वात संपुर्ण जिल्ह्यामध्ये पोलीस दल श्रीगणेश विसर्जन मिरवणूका शांततेत पार पडाव्यात यासाठी मेहनत घेत आहेत.
तीन दुर्देवी बालके;एक दुर्देवी युवक
बिलोली तालुक्यातील बामणी या गावात गणेश विसर्जनासाठी गेलेेले दोन भाऊ देवानंद पिराजी गायकवाड(12) आणि बालाजी पिराजी गायकवाड (11) आणि त्यांचा सहकारी वैभव पंढरी दुधारे (15) यांनी पाण्यात उतरून श्री गणेश विसर्जन करतांना त्यांचा मृत्यू झाला ही दुर्देवी घटनापण घडली आहे. गायकवाड आणि दुधारे कुटूंबाला झालेल्या दु:खात वास्तव न्युज लाईव्ह परिवार सुध्दा संवेदना व्यक्त करीत आहे. हा प्रकार दुपारी 1 वाजता घडला. नांदेड शहरातील गोवर्धनघाट पुलाखाली सुध्दा श्री गणेश विसर्जनासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा पाय घसरून तो नदीत पडला. परंतू तेथे हजर असलेल्या लोकांनी त्याला बाहेर काढले आणि उपचारासाठी दवाखान्यात पाठवले होते. परंतू दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मरण पावल्याचे सांगितले आहे.
