श्रीकांत पाठक खून प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हा शाखेने पकडले; 2 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-श्रीकांत पाठक यांच्या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या एका युवकास गणेश विसर्जन मिरवणुकीत स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पकडले आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी या आरोपीला 2 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
शहरातील सोमेेश कॉलनी येथे राहणाऱ्या श्रीकांत पाठक यांचा खून 23 जून 2023 रोजी रात्री 11 वाजता झाला होता. त्या प्रकरणात दाखल झालेल्या पोलीस प्राथमिकी क्रमांक 237/2023 मध्ये भारतीय दंड संहितेची कलमे 302, 307 यासह इतर कलमे जोडलेली होती. याप्रकरणात काही जणांना अटक झाली होती. परंतू प्राथमिकीमधील एक युवक पार्थ राजेश शर्मा (20) हा फरार होता. याप्रकरणाचा तपास वजिराबादचे सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.एस.मुत्येपोड यांच्याकडे देण्यात आला होता.
काल दि.28 सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन सुरू असतांना स्थानिक गुन्ह शाखेतील पोलीस उपनिरिक्षक दशरथ आडे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक संजय केंद्रे, पोलीस अंमलदार संभाजी केंद्रे, किशन मुळे, राजू पुल्लेवार, राजू बोधगिरे, शेख इसरायल, गजानन बयनवाड असे गणेश विसर्जन मिरवणुकीत गस्त करत असतांना त्यांना गुन्हा क्रमांक 237 मधील फरार आरोपी पार्थ राजेश शर्मा गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार या पोलीस पथकाने वजिराबाद चौकात पार्थ राजेश शर्मा यास ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी वजिराबाद पोलीसांच्या स्वाधीन केले. आज सहाय्यक पोलीस निरिक्षक मुत्येपोड आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी पार्थ राजेश शर्माला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने पार्थ शर्माला 2 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *