खादी खरेदीवर दोन हप्त्यात 20 टक्के सुट
नांदेड(प्रतिनिधी)-यंदाच्या वर्षी खादी खरेदी करणाऱ्यांना 20 टक्के रिबेटची सुविधा संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. खादी हा फक्त कपडा नसून तो एक विचार आहे म्हणून जनतेने खादी खरेदीवर भर द्यावा असे आवाहन मराठवाडा खादी ग्राम उद्योग समिती नांदेडचे सदस्य मंत्री ईश्र्वरराव भोसीकर यांनी केले आहे.
मराठवाडा खादी ग्राम उद्योग समितीच्या सभागृहात बोलवलेल्या पत्रकार परिषदेत ईश्र्वरराव भोसीकर बोलत होते. भारत देशात खादीचे महत्व समजून सांगतांना ईश्र्वरराव भोसीकर म्हणाले खादीचा कपडा उन्हाळ्यात वापरला तर तो थंडावा देतो आणि हिवाळ्यात वापरला तर तो आपल्या शरिराला गरम ठेवतो. बीआयएसने मराठवाडा खादी ग्राम उद्योग संस्थेला राष्ट्रध्वज विक्रीसाठी प्रमाणपत्र दिले आहे. या संस्थेचे वार्षिक उत्पन्न 2 ते 2.50 कोटी दरम्यान होत असते. संस्थेने तयार केलेल्या उत्पादन्नांची विक्री 4.50 कोटींची आहे. 150 कोटी रुपयांचे राष्ट्रध्वज दरवर्षी तयार होतात. परंतू मागणी त्यापेक्षा जास्त आहे. संस्थेने बनवलेले राष्ट्रीय ध्वज देशातील 16 राज्यांमध्ये जातात. खादी ग्राम उद्योगास ग्राहकांना रिबेट देण्यासाठी कोणतीही सोय उपलब्ध नसतांना सुध्दा यंदाच्या वर्षी 20 टक्के रिबेट आपल्याच उत्पन्नातून संस्था देणार आहे. विविध कपड्यांचे भांडार विक्रीसाठी सज्ज आहेत. संस्थेमध्ये सध्या 500 ते 550 कामगारांना रोजगार उपलब्ध आहे. राष्ट्रपतींच्यावतीने खादी ग्राम उद्योग संस्था नांदेडला दोनदा विणाई प्रकारात पारीतोषीक प्राप्त झाले आहे.
खादी हा फक्त कपडा नसून तो एक विचार आहे. स्वदेशी प्रेमींनी खादी खरेदीवर भर द्यावा आणि यंदा खादीदुत म्हणून काम करण्याचा संकल्प घ्यावा असे आवाहन ईश्र्वरराव भोसीकर यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे इतर सदस्य महाबळेश्र्वर मठपती, नागोराव सावंत, सटवा करेवाड यांची उपस्थिती होती.
खादी ग्रामउद्योग परिसर हा खुप मोठा आहे परंतू त्यास शासनाने कधीच भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. काही कामगारांची घरे याच परिसरात आहेत. परिसरातील बहुतेक इमारती लवकरच पडण्याच्या मार्गावर आहेत. यासंदर्भाने ईश्र्वरराव भोसीकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, एका बांधकाम व्यवसायीकासोबत या संदर्भाचा करार झालेला आहे. लवकरच खादी ग्रामोद्योग समिती एका नवीन स्वरुपात नांदेडकरांच्या समोर येणार आहे.

समितीने यावर्षी 2 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरदरम्यान सुती खादी(संस्था व परप्रांत), रेषम(स्पन, रिल्ड), पॉलीवस्त्र(संस्था आणि परप्रांत) या कपड्यांवर 20 टक्के रिबेट दिला आहे. तसेच दुसऱ्या हप्त्यात 1 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबरदरम्यान हा रिबेट सुरू राहिल. रिबेट अर्थात 100 रुपयंाची खादी घेतल्यानंतर ती 80 रुपयांमध्ये प्राप्त होईल. या माझ्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद द्यावा असे ईश्र्वरराव भोसीकर म्हणाले.
