
नांदेड(प्रतिनिधी)- राज्य शासनाने सप्टेंबर महिन्यात वेगवेळ्या तारखेला वेगवेगळे खाजगी करणाचे निर्णय घेवून तसा शासन आदेश निर्गमित केला. या खाजगीकरणाच्या विरोधात दि.6 रोजी सकाळी 11 वाजता महात्मा फुले पुतळ्यापासून विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने दिले.
राज्य शासनाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. शहरातील स्पर्धा परिक्षाची तयारी करणारे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, बेरोजगार विद्यार्थी-विद्यार्थींनी यांनी या मोर्चात सहभाग नोंदवला होता. सरकारी कर्मचाऱ्यांची 3 लाख पदे त्वरीत भरावी, प्राध्यापक भरती केंद्रीय पध्दतीने करावी, रिक्त असणाऱ्या शिक्षकांच्या जागा त्वरीत भराव्यात यासह विविध मागण्या घेवून विरोधी कृती समिती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. मागील अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग हा स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून विविध पदांच्या नोकरीची तयारी करत असून शासनाने खाजगी करणाच्या माध्यमातून ही पदे कंत्राटी स्वरुपात भरली जात असल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची संख्या निर्माण झाली आहे. खाजगीकरण रद्द करावे या मागणीसाठी विरोधी कृती समितीच्यावतीने आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये काही विद्यार्थ्यांनी शैक्षणिक मागण्याबरोबरच रुम भाड्याचे दर कमी करावे, दररोज मोफत 1 जीबी डाटा मोफत द्यावा अशा काही घोषणा या मोर्चात विद्यार्थी करत होते. यावेळी पोलीस प्रशासनाच्यावतीने कोणताही अनूचित प्रकार घडू नये म्हणून शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांच्या नेतृत्वात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.