20 वर्षापासून पडून होत्या दुचाकी गाड्या ; भाग्यनगर प्रांगण रिकामे झाले
नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी 8 जुलै रोजी 85 वाहनांपैकी 77 वाहनांची लिलावाद्वारे विक्री केली. 1 लाख 46 हजार रुपये ही शासकीय किंमत असतांना लिलावातून शासनाच्या खात्यात 5 लाख 50 हजार रुपये जमा झाल्याची माहिती भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके यांनी दिली आहे.
नांदेड जिल्ह्यात अनेक पोलीस ठाण्याच्या प्रांगणात जप्त केलेल्या वाहनांमुळे त्या पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये झालेली गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यात प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्गदर्शनात महसुल आणि राज्यपरिवहन विभाग यांच्यासोबत समन्वय साधून गाड्यांचा लिलाव केला.
दि.8 जुलै रोजी भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके यांनी गेल्या 20 वर्षापासून पोलीस ठाणे भाग्यनगरमध्ये जागा व्यापणाऱ्या 85 दुचाकी गाड्यांचा लिलाव जाहीर केला. त्या दिवशी खरेदीदारांची खुप गर्दी झाली होती. अशा परिस्थितीत पोलीसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोणातून भाग्यनगर पोलीस ठाण्यात बोलीदारांना आत घेवून भाग्यनगर पोलीस ठाण्याचे गेट बंद केले होते.
या लिलावादरम्यान साळुंके यांच्यासोबत परिवहन विभागाचे अधिकारी, महसुल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. लिलाव करतांना सर्व लिलाव प्रक्रिया व्हिडीओ चित्रीकरणाद्वारे अभिलेखात ठेवण्यात आली. सोबतच दोन पंचांच्या समक्ष या लिलाव प्रक्रियेला पुर्ण करण्यात आले. त्यातील 77 दुचाकी गाड्यांची विक्री लिलावाद्वारे झाली. दोन वाहनांबद्दल मालकी हक्काचा दावा समोर आल्याने त्या दोन गाड्या विकण्यात आल्या नाहीत. तसेच परिवहन विभागाने ठरविलेल्या विक्री किंमतीपेक्षा 5 गाड्यांची किंमत कमी आली म्हणून त्यांचा लिलाव रद्द करण्यात आला होता. लिलावात या वाहनांची किंमत 1 लाख 46 हजार रुपये ठरविण्यात आली होती. पण लिलावाद्वारे यातून 5 लाख 50 हजारांचे उत्पन्न झाले. प्रत्येकाला शासकीय पावती देऊन ही लिलाव प्रक्रिया पुर्ण झाली. 20 वर्षापासून पडलेल्या या गाड्या प्रांगणातून रिकाम्या झाल्याने भाग्यनगर पोलीस ठाण्याचे प्रांगण आता मोकळे झाले आहे.
भाग्यनगर पोलीसांनी शासकीय किंमतीपेक्षा चार पट जास्त किंमतीत लिलावाद्वारे दुचाकींची विक्री केली