निर्लज्ज सरकारकडून काय अपेक्षा-आदित्य ठाकरे

नांदेड(प्रतिनिधी)-गेल्या आठवड्यात राज्यातील नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणच्या सरकारी रुग्णालयातील रुग्णांचे मोठ्याप्रमाणात मृत्यू झाले. याला सरकारच जबाबदार आहे. गंभीर प्रश्नावर राजकारण करण्याऐवजी मुळाशी जाण्याची गरज आहे. मात्र गंभीर घटना घडूनही सरकार कोठेच दिसत नाही. हे सरकार निर्लज्ज आहे. यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची. आम्ही अधिष्ठाता आणि डॉक्टरांच्या सोबत आहोत हा विश्र्वास देण्यासाठी मी आज या तिन्ही ठिकाणचा दौरा करत आहे असे मत माजी मंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
नांदेड येथील कै.डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील परिस्थितीचा आढावा, अधिष्ठाता आणि या ठिकाणची डॉक्टर आणि नर्स व रुग्णालयातील पेशंट व त्यांचे नातेवाईक यांच्याशी चर्चा केल्यानंतर ठाकरे पत्रकारांशी बोलत असतांना म्हणाले की, राज्यातील नांदेडसह छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील घटना ह्या दुर्देवी आहेत. सरकारी रुग्णालयात औषधी नाहीत ही परिस्थिती उघड होत आहे. आमच्याकडे औषधे नाहीत तुम्ही बाहेरून घ्या असे रुग्णांना सांगत आहेत ही बाब गंभीर आहे. आम्हाला यावर राजकारण करायचे नाही. आम्ही आंदोलन करून मोर्चे काढू शकलो असतो पण ते आम्हाला करायचे नाही. यातील जो काही मुळ प्रश्न आहे. त्याच्याशी आम्हाला हात घालून हा प्रश्न सोडवायचा आहे. मोर्चे काढल्यामुळे अधिष्ठाता आणि डॉक्टर्स यांच्यावर दबाव वाढतो व यांच्यावर गुन्हे दाखल होता व त्यांच्या बदल्या केल्या जातात. मात्र असे करण्याऐवजी सत्य परिस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. हीच आरोग्य यंत्रणा की, त्यांनी कोविड काळात राज्यातील जनतेला अतिशय जलद आणि दर्जेेदार सुविधा पुरवल्या. संपूर्ण राज्याच कौतुक जगभरात झाल. मग आता नेमका कोणता बदूल झाला असा सवाल त्यांनी यावेळी केला. हाफकीनची जबाबदारी दुसऱ्या प्राधिकरणाकडे देण्यात आली आहे हे योग्य नाही. रुग्णालयाकडे पुरेसा निधी आला नाही, औषधी वाढविण्याची गरज असतांना औषधांचा पुरवठा झाला नाही. औषधे खरेदीसाठी रुग्णालय प्रशासनाला जबाबदारी द्यावी, या प्रक्रियेत बदल होणे गरजेचे आहे. नेमके अशा घटना का घडल्या याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. औषधांचा पुरवठा होतो की नाही हाच मुळ प्रश्न आहे.
राज्यात अशा दुर्देवी घटना होत असतांना सरकार मात्र दिसत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोठे आहेत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आणि अशा निर्लज्ज सरकारकडून आपण काय अपेक्षा ठेवायची अशी खंत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आणि औषधी खरेदी करण्याचा अधिकार हा अधिष्ठातांना देण्यात यावा.रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *