नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड, हिंगोली, यवतमाळ आणि परभणी अशा चार जिल्ह्यांचे खासदार परंतू लोकसभा मतदार संघ हिंगोली असलेल्या मतदार संघातील खासदार हेमंत पाटील यांच्या समर्थकांनी आज रद्द करा…रद्द करा…ऍट्रॉसिटी रद्द करा असे म्हणत मोर्चा काढला. मोर्चानंतर पत्रकारांशी बोलतांना श्रीकांत गायकवाड म्हणाले कायद्याचा व संविधानाचा दुरूपयोग आम्ही खपवून घेणार नाही. यावेळी माधव देवसरकर म्हणाले की, ऍट्रॉसिटी हा कायदा पुर्वी जामीन पात्र होता नंतर तो अजामीन पात्र झाला. त्यासाठी सुध्दा हेमंत पाटील सभागृहात नक्कीच पाऊले उचलतील.

खा.हेमंत पाटील यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 353 आणि ऍट्रॉसिटी कायदा जोडून डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.शाम वाकोडे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला. शासकीय रुग्णालयात मरण पावलेल्या लोकांमधील एका नातेवाईकाच्या तक्रारीवरुन डॉ.शाम वाकोडे आणि बालक कक्षाचे प्रमुख डॉक्टर या लोकांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 304(अ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला. या प्रकरणानंतर नांदेड हे नेत्यांसाठी पर्यटनस्थळ झाले. प्रत्येकाने आप-आपल्या परिने रुग्णालयात घडलेल्या घटनेचे विश्लेषण करून पत्रकारांसमोर मांडले. हेमंत पाटील यांनी अधिष्ठाता डॉ.वाकोडेसोबत केलेल्या घटनेचा निषेध सर्वांनीच केला. पण प्रत्येक जागी काही न काही लागेबांधे असतात आणि यातूनच श्रीकांत गायकवाड यांनी पुढकार घेवून सर्व समाजाच्यावतीने जनआक्रोश मोर्चा काढला. हा मोर्चा तिरंगा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा चालत आला त्यावेळी मोर्चातील लोकांनी रद्द करा…रद्द करा…ऍट्रॉसिटी रद्द करा अशा घोषणा दिल्या. काहींनी ऍट्रॉसिटी कायदा हे आमचे छत्र आहे परंतू त्याचा दुरूपयोग आम्ही सहन करणार नाही असे मोर्चादरम्यान सांगितले.

मोर्चात सहभागी लोकांसाठी जुन्या शासकीय रुग्णालयासमोर जेवणाची सोय करण्यात आली होती.दुरसंचार कार्यालयासमोर लावलेल्या पेंडॉलमध्ये मोर्चात सहभागी झालेल्या लोकांनी आप-आपले मत व्यक्त करतांना लोकप्रतिनिधी असलेल्या हेमंत पाटील यांच्या विरुध्द खोटा ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो तेंव्हा सर्व सामान्याचे काय असा प्रश्न उपस्थित केला. काही राजकीय लोकांच्या दबावाखाली येवून हेमंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला. परंतू दवाखान्यात मरण पावलेल्या रुग्णांबाबत काही करण्यात आले नाही असे निवेदनात लिहिले आहे परंतू डॉ.वाकोडेवर सुध्दा गुन्हा दाखल झाला याबद्दल कोणी काही बोलले नाही.
मोर्चा संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून आल्यानंतर श्रीकांत गायकवाड यांनी नांदेडचे भुमिपूत्र खासदार हेमंत पाटील यांच्यावर ऍट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला म्हणूनच आम्ही सर्व समाजाने मिळून हा भव्य मोर्चा काढला. याप्रसंगी माधव देवसरकर म्हणाले स्वत:च्या नोकऱ्या वाचविण्यासाठी असाच ऍट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये 280 दिवसांत 140 खोटे ऍट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले आहेत असे देवसरकर म्हणाले. काही नेते 89 हजारांचा चेक काढण्यासाठी ऍट्रॉसिटी दाखल करतात. काही नेते पैसे घेवून ऍट्रॉसिटीला पाठींबा देतात याचीही चौकशी झाली पाहिजे असे देवसरकरांना वाटते. लोकप्रतिनिधींवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो तर सर्वसामान्य माणसाचे काय असा प्रश्न उपस्थित केला. ऍट्रॉसिटी कायदा अगोदर जामीन पात्र होता नंतर तो अजामीन पात्र करण्यात आला याबद्दल हेमंत पाटील लोकसभेत पाऊले उचलतील असे सांगितले.