नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या वडीलांच्या खूनाचा बदला खून करून घेणाऱ्या युवकाला चौथ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 3 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्यासुमारास धनेगाव येथील पेट्रोलपंपासमोर रस्त्यावर शेख बाबु शेख महेबुब (44) हे व्यक्ती आपल्या दुचाकीवर जात असतांना तीन जणांनी त्यांना रस्त्यात गाठून त्यांना लाकडी बॅटने डोक्यावर, तोंडावर अनेक वार करून त्यांना गंभीर जखमी केले आणि त्यांचा खून केला. याबाबत अहेमद खान मनु खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मारेकरी मोहम्मद शकील मोहम्मद नासेर, मोहम्मद बिलाल मोहम्मद नासेर दोघे रा.धनेगाव आणि शेख नजीर शेख एकबाल रा.तुराबनगर देगलूर नाका या तिघांनी हा घटनाक्रम घडवला. मोहम्मद शकीलचे वडील मोहम्मद नासेर यांचा सन 2009 मध्ये खून झाला होता आणि तो खून शेख बाबु शेख महेबुबने केला होता. या रागातून त्या तिघांनी शेख बाबुचा खून केला.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 34 नुसार गुन्हा क्रमांक 738/2023 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्र्वर मठवाड यांच्याकडे देण्यात आला. नांदेड ग्रामीण पोलीसांनी मेहनत घेवून तिन मारेकऱ्यांपैकी एक मोहम्मद शकील मोहम्मद नासेर यास अटक केली. आज मोहम्मद शकील मोहम्मद नासेरला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करत मोहम्मद शकील मोहम्मद नासेरला 3 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.