नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या शेतातील फळ लागवडीची इंट्री संगणकात घेण्यासाठी तहसील कार्यालय नायगाव(खैरगाव) येथील डाटाइंट्री ऑपरेटर (कंत्राटी) याने 1200 रुपयांची लाच स्विकारल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास जेरबंद केले आहे.
एका तक्रारदाराने 18 ऑक्टोबर 2023 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, लिपीक तथा डाटा इंट्री ऑपरेटर (कंत्राटी) ज्यांच्याकडे पंचायत समिती नायगाव खैरगाव या पदाचा सुध्दा अतिरिक्त कार्यभार आहे ते शिवराज दत्तमराम नखाते (36) हे 1500 रुपये लाच मागणी करत आहे. कारण मौजे आंतरगाव ता.नायगाव येथील शेत गट क्रमांक 592 मध्ये त्यांची वडीलोपार्जित 34 गुंठे शेत जमीन आहे. सन 2021-22 मध्ये पंचायत समिती नायगाव यांच्याकडून फळबाग लागवडीसाठी त्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत एकूण 1 लाख 50 हजार रुपयांचे शासकीय अनुदान मंजुर झाले आहे. या शेत जमीनीत तक्रारदाराने 250 पेरुंच्या झाडाची लागवड केली. ही कामे त्यांनी विविध शेत मजुरांकडून करून घेतली. झालेल्या कामाचे 1 लाख 35 हजार रुपये प्रत्येकी 45 हजार रुपये टप्याने तक्रारदाराला मिळालेले आहेत. चौथ्या टप्यातील झालेल्या कामाचे ई-मस्टर मागणी अर्ज त्या तक्रारदाराने ग्राम पंचायत समिती नायगाव येथे केला. आपले बिल मिळत नाही. म्हणून त्याचा पाठपुरावा केला. तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की, माझ्या पिकांची नोंद ई-मस्टरमध्ये करण्यात आलेली नाही. ती डाटा इंट्री करावी म्हणून तक्रारदार शिवराज दत्तमराव नखाते (36) यांना भेटले त्यावेळी नखाते यांनी पेरुच्या झाडांची इंट्री करून देण्यासाठी 15 रुपयांची लाच मागितली. हे 1500 रुपये लाचच असल्याची खात्री झाल्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या मागणीची पडताळणी करतांना शिवराज दत्तमराव नखाते यांनी पंचासमक्ष तडजोड करून 1200 रुपये लाच घेण्यास संम्मती दिली आणि आज 19 ऑक्टोबर रोजी 1200 रुपये लाच स्विकारल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने डाटा इंट्री ऑपरेटर शिवराज दत्तराम नखातेला जेरबंद केले आहे. वृत्तलिहिपर्यंत पोलीस ठाणे नायगाव येथे या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक संदीप थडवे, पोलीस अंमलदार गजेंद्र मांजरमकर, यशवंत दाबनवाड, ईश्र्वर जाधव आणि मारोती सोनटक्के यांनी ही कार्यवाही पुर्ण केली.
नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, त्यांचे कोणतेही शासकीय काम करण्यासाठी कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी, किंवा त्यांच्यावतीने खाजगी माणुस कायदेशीर फिस व्यतिरिक्त अन्य रक्कम लाचेच्या सदरात मागणी करीत असल्यास दुरध्वनी क्रमांक 02462-253512 आणि टोल फ्रि क्रमांक 1064 तसेच पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांचा मोबाईल क्रमांक 7350197197 यावर सुध्दा भ्रष्टाचाराची माहिती देता येईल.
पेरुंच्या झाडांची लागवड ई-मस्टरमध्ये करण्यासाठी 1200 रुपये लाच स्विकारणारा डाटा इंट्री ऑपरेटर गजाआड