नांदेड(प्रतिनिधी)- एका महिलेला 1350 चौरस फुटाचा भुखंड देतो म्हणून त्यांच्याकडून खोटी व बनावट सौद्दाचिठ्ठी तयार करून त्यांना दिली आणि त्यांच्याकडून 4 लाख रुपये घेतले. याप्रकरणी अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी चौकशी अहवालाचे अवलोकन केल्यानंतर 6 जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याच्या आरोपी सदरात एका वकील साहेबांचे नाव आहे.
श्रीमंता पांडूरंग मुंडे या महिला तहसील कार्यालयात सेवक आहेत. टपालाचे वाटप करतांना न्यायालयामध्ये त्यांची ओळख माणिक वाखरडे यांच्यासोबत झाली. त्यांनी श्रीमंता मुंडे यांना व्यंकटी नरबाजी मोरे यांच्याकडे असलेले भुखंड घ्या. ती चांगली गुंतवणूक आहे अशी भुल त्यांना दिली. श्रीमंता मुंडे यांना गट क्रमंाक 62/ए मधील 54 x 25 असा 1350 चौरस फुटाचा भुखंड दाखवला. शिवदास बारसे यांनी त्यांना सांगितले की, मी हा भुखंड सौदाचिठ्ठीच्या आधारे व्यंकटी मोरे यांच्याकडून घेतला आहे आणि मी सुध्दा सौदाचिठ्ठी करून भुखंड देतो. यानंतर अनेकांसमक्ष 100 रुपयांच्या मुद्रांक कागदावर सौदाचिठ्ठी झाली. हा प्रकार 3 जुलै 2021 रोजी नोटरी रजिस्टरमध्ये नोंद करून झाला. याबाबतचे पैसे देण्याचा व्यवहार रेल्वे स्थानक रस्त्यावरील हॉटेल कृष्णविलासमध्ये घडला. त्यानंतर 10 जुलै 2021 रोजी, 20 जानेवारी 2022 रोजी, 28 ऑगस्ट 2022 रोजी भुखंड विक्रेत्यांची भेट घेतली. परंतू कशाचा भुखंड आणि काय असे प्रतिप्रश्न विचारून त्यांनी माझे 4 लाख रुपये ठकवले आहेत असे या तक्रारीत लिहिले आहे. तक्रारीतील आरोपी रकान्यामध्ये शिवदास माधवराव बारसे रा.बारसगाव ता.अर्धापूर, व्यंकटी नरबाजी मोरे, सुरेखा व्यंकटी मोरे, सचिन व्यंकटी मोरे, नितीन व्यंकटी मोरे सर्व रा.वसरणी जि.नांदेड आणि ऍड.माणिक बापुराव वाखरडे अशा सहा जणांची नावे नमुद आहेत. वजिराबाद पोलीसांनी अपर पोलीस अधिक्षक कार्यालयाचे पत्र दि.24 फेबु्रवारी 2023 नंतर 17 ऑक्टोबर 2023 रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 504, 506 आणि 43 नुसार सहा जणांविरुध्द गुन्हा क्रमांक 459/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास वजिराबादचे दबंग पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे यांच्याकडे देण्यात आला आहे.
भुखंड देतो म्हणून एका महिलेची 4 लाखांची फसवणूक; सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल