नांदेड(प्रतिनिधी)-सहकार चळवळ ज्या मोठ्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. त्या उद्देशाला हरताळ फासत कॉंगे्रस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने साखर कारखाने आपसात वाटून घेतले आणि शरद पवार यांच्या चेल्यांनी सहकार चळवळीचे श्राध्द घातल्याचा आरोप रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांशी संवाद दौरा सदाभाऊ खोत यांनी आयोजित केला आहे. सोबतच मध्यमवर्गीय, कामगार यांचे प्रश्न समजवून घेण्यासाठी ते मेहनत घेत आहेत. नांदेड जिल्ह्यातील अंतरगाव येथे मारोती शिंदे आणि उमरा येथील भीमराव क्षीरसाट या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांना भेटण्यासाठी आ.सदाभाऊ खोत नांदेड येथे आले होते. ते आज दि.14 जुलै रोजी पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्रमध्ये सहकार क्षेत्रातून सर्वसामान्य माणूस, शेतकरी यांना मालक बनविण्याची एक सुंदर कल्पना आणण्यात आली होती. त्या माध्यमातून राज्यात सहकारी साखर कारखाने तयार झाले. पण राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंगे्रस या पक्षांनी हे साखर कारखाने आपसात वाटून घेतले किंबहुना ढापले आहेत असा आरोप आ.सदाभाऊ खोत यांनी केला. राज्यात 55 सहकारी साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यांचा घोळ 25 हजार कोटींचा आहे. जिल्हा सहकारी बॅंकांचे हात सुध्दा या कारखान्यांच्या घोटाळत गुंतलेले आहेत. सर्व कारखान्यांची मिळून 12 हजार एकर जमीन आहे. या कारखान्यांमध्ये सरकारचे भाग भांडवल हे 1200 कोटी आहे. तर शेतकऱ्यांचे भाग भांडवल हे 2500 कोटी आहे. हे साखर कारखाने ढापण्यासाठी शरद पवार यांच्या चेल्यांनी खोट्या खाजगी कंपन्या नोंदणीकृत केल्या ज्यामध्ये कोणतीही उलाढाल नव्हती आणि 10-20 कोटी रुपयांमध्ये हे साखर कारखाने त्यांनी खरेदी करून शेतकऱ्यांची वाट लावली आहे. हे सर्व साखर कारखाने पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीचे व्हावेत यासाठी भविष्यात आंदोलन करण्याची गरज पडली तरी ती रयत क्रांती संघटना करणार असल्याचे आ.सदाभाऊ खोत म्हणाले.
गेल्या खरीप हंगामात राज्यभर सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा प्रकार गाजला. 50 हजार शेतकऱ्यांनी याबद्दल तक्रारी अर्ज दिले. पण शेतकऱ्यांना एक रुपया सुध्दा मिळाला नाही. चक्रीवादळ, गारपीट, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पण त्याबद्दलही शेतकऱ्यांना काही मदत मिळाली नाही. मागील हंगामात शेकऱ्यांनी 5800 कोटी रुपयांचा पिक विमा भरला पण विमा दिला तेंव्हा फक्त 900 कोटी रुपये देण्यात आले. याचा अर्थ 4 हजार रुपये भरा आणि 1 हजार रुपये घ्या असाच होतो असे आ.सदाभाऊ खोत म्हणाले. पिकविम्याची रक्कम मिळाली नाही तर विमा कार्यालये जागेवर ठेवणार नाही असा कांगावा करणारी शिवसेना आता राज्याच्या सत्तेत तुपात हात बुडवुन चाटत बसली आहे असे आ.सदाभाऊ खोत म्हणाले. राज्यात फक्त 20 टक्के पिक कर्ज देण्यात आले आहेत. ते उद्दिष्टापेक्षा खुप कमी आहे. नांदेड जिल्ह्यात सुध्दा पिक कर्जाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे.
कृष्णूर येथील इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीने शेतकऱ्यांकडून शेत माल घेतला आहे. पण शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. याबद्दल इंडिया मेगाच्या मालकांची संपत्ती जप्त करून ती शेतकऱ्यांची रक्कम परत देण्यात यावी असे निवेदन रयत क्रांती संघटना ईडीला देणार असल्याचे आ.सदाभाऊ खोत म्हणाले. यंदाचे अधिवेशन दोन दिवसात ठेवून शासनाने अधिवेशनातून पळ काढला आहे. त्यामुळे बरेच प्रश्न अधिवेशनात मांडणे शिल्लक राहिले आहेत असे आ.सदाभाऊ खोत म्हणाले.
या पत्रकार परिषदेत रयत क्रांती संघटनेचे पांडव मंगनाळे, डॉ.दत्ता मोरे, जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे, सचिन कदम यांचीही उपस्थिती होती.
शरद पवार यांच्या चेल्यांनी सहकार क्षेत्राचे श्राध्द घातले-आ.सदाभाऊ खोत