खून, दरोडा आणि मकोका खटल्यातून सात युवकांची सुटका

नांदेड(प्रतिनिधी)-9 एप्रिल 2019 रोजी दाखल झालेल्या एका गुन्हा प्रकरणात त्या प्रकरणी पुढे दरोडा, खून सोबत मकोका कायदा जोडून दाखल झालेल्या दोषारोपपत्रातून सात आरोपींची मुक्तता केल्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी जारी केले आहेत. याप्रकरणात मकोका कायद्याअंतर्गत तुरूंगात असलेले पोलीस निरिक्षक विनोद दयाळु दिघारे यांचीही साक्ष घेण्यात आली होती.
8 एप्रिलच्या रात्री 8 वाजता ते 9 एप्रिलच्या पहाटे 8 वाजेदरम्यान नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात ड्युटी ऑफिसर असलेले पोलीस उपनिरिक्षक राजाभाऊ जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फोनवर माहिती मिळाल्यानंतर विद्यापिठाजवळ दोन जणांनी कारवर बंदुकीने हल्ला करून त्यातील लोकांना जखमी केले आहे. नांदेड ग्रामीण पोलीस पथक तेथे गेले असतांना त्यात डॉ.सतिश गायकवाड आणि त्यांच्या कुटूंबियांवर हल्ला झाला होता. पण ते थोडक्यात बचावले. त्यानंतर हल्लेखोरांनी त्वरीत प्रभावाने बीडीडीएस कार्यालयासमोर कार क्रमांक एम.एच.24 ए.एस.8447 थांबवली. त्यातील व्यक्ती शेख नजीब अब्दुल गफार यास खाली पाडून त्यांची कार हल्लेखोरांनी पळवून नेली होती. राजाभाऊ जाधव यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा क्रमांक 174/2019 दाखल करण्यात आला. त्यात भारतीय दंड संहितेची कलमे 302, 397, 398, 34 आणि भारतीय हत्यार कायद्याचे कलम 3/25 जोडण्यात आले होते. सुरुवातीला हा तपास पीएसआय शेख यांच्याकडे देण्यात आला होता. गुन्हा दाखल झाला तेंव्हा यातील सर्व हल्लेखोर अज्ञातच होते. पोलीसांनी आपली सर्वशक्ती पणाला लावून त्या रात्री खून करून चोरुन नेलेली चार चाकी गाडी जप्त केली त्यावेळी घडलेले नाट्य अत्यंत भयंकर होते. पण त्याचा कोणताही अभिलेख उपलब्ध नसल्यामुळे तो आज आम्ही लिहित नाही. एका पोलीस निरिक्षकाला मारु टाकण्यासाठी पोलीस अधिक्षकांनी रिव्हाल्वर आपल्या हातात घेतले होते असे त्या दिवशी हजर असणारे पोलीस तेंव्हा सांगत होते.
पुढे या तपासात पोलीसांनी सुरेंद्रसिंघ उर्फ सुरज जगतसिंघ गाडीवालेे(19), शुभम राजकुमार खेळबुडे(20), शिल्पेश राजेंद्रकुमार निळेकर(21), जसप्रितसिंघ उर्फ यश गेंदासिंघ कामठेकर (19), अमरसिंघ नारायणसिंघ वासरीकर(19), शरणपालसिंघ उर्फ पुनित गुरमितसिंघ राघी (20), हरजिंदरसिंघ उर्फ हरजितसिंघ उर्फ आकाश जगतसिंघ गाडीवालेे(20) अशा सात जणांना आरोपी करण्यात आले. हा सर्व घटनाक्रम संघटित गुन्हेगारीचा आहे म्हणून या प्रकरणात मकोका कायदा जोडला गेला आणि त्यानंतर त्याप्रकरणाचा तपास पोलीस उपअधिक्षक धनंजय पाटील यांच्याकडे देण्यात आला. या घटेनचा तपास पुर्ण करून धनंजय पाटील यांनी सात जणांविरुध्द मकोका न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. तो विशेष खटला क्रमांक 94/2020 या क्रमांकाने चालला. या सर्व आरोपींना अटक करण्यात जवळपास 4 महिने लागले.
या प्रकरणातील आकाश गाडीवाले हा 8 एप्रिल 2019 रोजी किरतपुर सबजेल पंजाब येथे एका खूनाच्या प्रकरणात तुरूंगात होता.या प्रकरणातील शिल्पेश या युवकाकडून पकडण्यात आलेले दोन मोबाईल आणि जीवंत काडतूस जप्त करण्याबद्दल न्यायालयाने शंका उपस्थित केली आहे. पुरावा कायदा 27 प्रमाणे जप्त करण्यात आलेल्या वस्तुंबद्दल तथ्यपुर्ण पुरावा उपलब्ध झाला नाही असे न्यायायलाने लिहिले आहे. मयत व्यक्तीच्या शरिरातून एक गोळी निघाली होती असे वैद्यकीय अधिकाऱ्याने न्यायालयासमोर सांगितले.या सर्व प्रकरणात सर्व आरोपी हे कोण्या गॅंगचे सदस्य आहेत असे सिद्दच झाले नाही.अनेक गुन्ह्यांमध्ये ह्या आरोपींचा सहभाग होता असे जबाब काही पोलीस अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिले परंतू त्या संदर्भाने कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही.कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, ऍप डाटाया पध्दतीने सुध्दा कोणताही पुरावा न्यायालयासमक्ष उपलब्ध झालेला नाही. या प्रकरणात एकूण 19 साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवलेले होते. त् यात सध्या मकोका कायद्याअंतर्गतच तुरुंगात असलेल्या पोलीस निरिक्षक विनोद दयाळू दिघोरे यानी सुध्दा साक्ष दिली होती. परंतू कोणताही ठोस पुरावा आरोपींना शिक्षा देण्यासाठी उपलब्ध झाला नाही म्हणून मकोका विशेष न्यायाधीश चंद्रशेखर मराठे यांनी या या प्रकरणातील सर्व आरोपींची मुक्तात केली आहे. या खटल्यात आरोपींच्यावतीने ऍड.आर.जी.परळकर, ऍड.मिलिंद एकताटे, ऍड.यदुपत अर्धापूरकर यांनी बाजू मांडली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *