जिंतूर(प्रतिनिधी)-एका चार चाकी गाडीसह जिंतूर पोलीसांनी 19 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
जिंतूरचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द सोपानराव काकडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.29 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 2 वाजेच्यासुमारास त्यांना चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.37 टी. 0357 ही गाडी सापडली. त्या गाडीची तपासणी केली असता त्या गाडीमध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा भरलेला होता. गोवा गुटखा आणि चार चाकी गाडीची किंमत 19 लाख 60 हजार रुपये आहे. या कार्यवाहीमध्ये अनिरुध्द काकडे यांच्या सोबत सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सय्यद, पोलीस उपनिरिक्षक दिनेश येवले, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक मेटके, पोलीस अंमलदार मुरकुटे, निलेश जाधव, निळेकर, हनुमंत अंबोरे, बाळकृष्ण कांबळे यांनी सहभाग घेतला.
जिंतूर पोलीस ठाण्यात या तक्रारीनुसार नवनाथ शहाजी डोंबे (28) रा.बलसा ता.जिंतूर आणि शेख मुख्तार शेख सत्तार (24) रा.बलसा रोड गजानन मंदिरजवळ जिंतूर या दोघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 328, 188, 272, 273 आणि अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 च्या कलम 59 नुसार गुन्हा क्रमांक 454/2023 दाखल केला आहे. विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर, परभणीच्या पोलीस अधिक्षक रागसुधा आर. अपर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांनी जिंतूर पोलीसांचे कौतुक केले आहे.
