नांदेड(प्रतिनिधी)-उधारी घेतलेले 20 हजार रुपये परत मागितल्यानंतर एका व्यक्तीने 27 वर्षीय युवकाचा नवजिवननगर नांदेड येथे सन 2019 मध्ये खून केला होता. आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी मारेकऱ्याला जन्मठेप आणि 55 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
दि.18 जून 2019 रोजी सायंकाळी 6 वाजता संदीप श्रीरंग सदावर्ते याने आपले मोठे बंधू प्रदीप यांना फोन केला आणि सांगितले की, संजय गिरमाजी कापुरे याला दिलेले 20 हजार रुपये परत मागितले असता तो माझ्याशी भांडण करत आहे. त्याबद्दल मी त्याला समजून सांगितले. मी आल्यावर पाहु असे सांगून संदीपला घरी पाठवले. रात्री 8 वाजता छत्रपती चौक ते जैन मंदिर जाणाऱ्या रस्त्यावर नरेश किराणा स्टोअर्स समोर संदीप श्रीरंग सदावर्ते (27) यास संजय गिरमाजी कापुरे याने चाकुने हल्ला करून जखमी केले होते. संदीपच्या छातीत, डोक्यात, कपाळावर, डाव्या बाजूच्या खांद्यावर, डाव्या हाताच्या पंज्यावर जखमा होत्या. ही माहिती मिळाल्यानंतर प्रदीप श्रीरंग सदावर्ते यांनी आपले जखमी बंधू संदीप श्रीरंग सदावर्ते यांना दवाखान्यात नेले. त्या ठिकाणी पुरशा सुविधा उपलब्ध नव्हत्या. म्हणून तेथून शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर संदीप श्रीरंग सदावर्ते यांचा मृत्यू झाला आहे असे घोषित केले.
प्रदीप श्रीरंग सदावर्ते यांच्या तक्रारीवरुन संदीप सदावर्तेचा खून करणारा संजय गिरमाजी कापुरे (45) या विरुध्द भाग्यनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 182/2019 भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि 506 नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.के.डमाळे यांनी केला.
आर.के.डमाळे यांनी संजय गिरमाजी कापुरेला अटक करून सविस्तर तपास करून त्याच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्याला 367/2019 असा क्रमांक मिळाला. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने 14 साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. मयत संदीप सदावर्तेसोबत भांडण करून संजय कापुरे घरात गेला आणि तेथून चाकु घेवून आला आणि हल्ला केला हे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होते. तसेच अनेक जण प्रत्यक्ष घटना पाहणारे साक्षीदार यांनी न्यायालयात जबाब दिला. उपलब्ध पुराव्या आधारे न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी संजय गिरमाजी कापुरेला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 नुसार जन्मठेप आणि 50 हजार रुपये रोख दंड ठोठावला. भारतीय दंड संहितेच्या कलम 506 नुसार दोन वर्षाची सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड ठोठावला. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने ऍड.रणजित देशमुख यांनी काम पाहिले. भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुर्यमोहन बोलेमवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार सादिक पटेल यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका वठवली. संजय गिरमाजी कापुरेला दिलेल्या दोन्ही शिक्षा एकत्रीत भोगायच्या आहेत. तसेच मयत संदीप श्रीरंग सदावर्ते यांच्या कुटूंबियांना योग्य नुकसान भरपाई मिळावी असा आदेश न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी विधीसेवा प्राधिकरण नांदेड यांना केला आहे.
27 वर्षीय युवकाचा खून करणाऱ्यास जन्मठेप; 55 हजार रुपये रोख दंड