नांदेड(प्रतिनिधी)-नागार्जुना पब्लिक स्कुलच्या सहा पिडीत शिक्षकांनी कालपासून उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस असतांना सुध्दा अद्याप कोणी त्याची दखल घेतलेली नाही.
नागार्जुना पब्लिक स्कुलमध्ये 12 ते 20 वर्ष शिक्षक म्हणून काम केलेल्या सहा जणांना शाळा व्यवस्थापनाने अचानकच जानेवारी 2023 पासून काम बंद करण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार या शिक्षकांना आजपर्यंत पगार मिळालेला नाही. या शिक्षकांनी वेगवेगळ्या सक्षम प्राधिकरणांकडे आपल्या न्याय मागण्यांसाठी अनेक उंबरठे झिजवले. परंतू कोठेच त्यांची सुनावणी होत नाही. आता जवळपास 11 महिने होत आले आहे. या शिक्षकांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न सुध्दा त्यांना भेडसावत आहे. म्हणून सहा पिडीत शिक्षक अतुल राजूरकर, सौ.निशा गुडमेवार, मंगला वाघमारे, नामदेव शिंदे, बालाजी पाटील आणि अविनाश चमकुरे यांनी नागार्जुना पब्लिक स्कुलच्या समोर आमरण उपोषण, धरणे आंदोलन कालपासून सुरू केले आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. तरीपण जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग किंवा शाळा व्यवस्थापनाने त्यांची कोणतीच दखल घेतलेली नाही. शिक्षकांना अनेक शिक्षक संघटनांनी आणि पालक संघटनांनी पाठींबा दर्शवला आहे. पण अद्याप त्यांच्या आंदोलनावर कोणतीही विचारणा झालेली नाही हेच या लोकशाहीतील महत्व आहे.
नागार्जुना पब्लिक स्कुलसमोर शिक्षकांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा दुसरा दिवस