अधिक्षक अभियंता राजपूत आणि वरिष्ठ लिपीक कंधारे पाच दिवसांच्या पोलीस कोठडी वास्तव्यात

नांदेड(प्रतिनिधी)-6 लाख 40 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या अधिक्षक अभियंता आणि वरिष्ठ लिपीक सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड या दोघांना विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मागितलेल्या पाच दिवसाची पोलीस कोठडी पुर्णता: मंजुर केली आहे. या दोघांना आम्ही सायंकाळी घरी घेवून जाणार आहोत अशा आशेने आलेले सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता, अनेक अभियंते, अनेक कंत्राटदार, काही पत्रकार यांच्या पदरीमात्र न्यायाधीशांच्या निर्णयानंतर निराशा पडली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आपली नोकरी सोडून भ्रष्टाचारमध्ये लिप्त असलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी आपल्या नोकरीला फाटा देवून न्यायालयात जाऊ शकतात काय? हाही प्रश्न आजच्या पोलीस कोठडी सुनावणीच्यावेळी समोर आला आहे.
काल रात्री नांदेड साार्वजनिक बांधकाम मंडळचे अधिक्षक अभियंता (वर्ग-1) गजेंद्र हिरालाल राजपूत (54 वर्ष), वरिष्ठ लिपीक वर्ग-3 विनोद किशनराव कंधारे (47) यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या इमारतीत 1 नोव्हेेंबर रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास 6 लाख 40 हजार रुपये लाच स्विकारली. सोबतच विनोद कंधारे यांच्या कक्षातील ड्रायव्हरमध्ये 54 लाख 99 हजार 900 रुपयांची रक्कम सापडली. केदारगुड्डा, पिंगळी, डोंगरगाव, हदगाव, गोरलेगाव, गुरफळी रस्ता अशा 14 किलो मिटर रस्त्याचे काम दोन विभागात मिळाले होते. अर्थात त्यांना 48 किलो मिटरचा रस्ता तयार करण्याच्या निविदा मिळाल्या होत्या. या दोन निविदांची किंमत 14 कोटी 10 लाख रुपये आहे. या रक्कमेपैकी अर्धा टक्का सरसकट 7 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. 1 नोव्हेंबर रोजी लाचेचा स्विकार गजेंद्र राजपूत यांच्यावतीने स्वत:साठी आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी विनोद कंधारे यांनी केला. लाचेतील 6 लाख रुपये अधिक्षक अभियंता गजेंद्र राजपूत यांचे तर 40 हजार विभागातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ठरले होते. याप्रकरणाचा गुन्हा क्रमांक 403/2023 भाग्यनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 आणि 12 नुसार दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्याकडे देण्यात आला.
पकडलेल्या गजेंद्र राजपूत आणि विनोद कंधारे यांना पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील, पोलीस अंमलदार गजानन राऊत, राजेश राठोड, प्रकाश मामुलवार, अर्शद खान, सचिन गायकवाड आदींनी न्यायालयात हजर केले. न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख आणि पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांनी पोलीस कोठडी मागणीची कारणे न्यायालयसमक्ष सविस्तरपणे सांगितली. दोन्ही आरोपींच्यावतीने ऍड.महेश कनकदंडे, ऍड.आर.जी.परळकर, ऍड.अनुप पांडे, ऍड .बालाजी शिंदे आणि ऍड.शिरीष नागापूरकर यांनी सादरीकरण करून खुप मेहनत घेतली.
सरकार पक्षाच्यावतीने सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार विनोद कंधारे यांच्या कक्षातून 48 लाख 49 हजार 900 रुपये आणि गजेंद्र राजपूत यांच्या घरातून 24 लाख 31 हजार 590 रुपये जप्त करण्यात आले. यातील काही बंडलांमध्ये ते पॉकीटात ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यांच्यापुढे आस्थापनेचे नाव, गावाचे नाव आणि काही व्यक्तींची नावे आहेत त्याबद्दल तपास करायचा आहे. विनोद कंधारे यांच्याकडे 85 लाख रुपये मुल्यांकन असलेली दोन मजली इमारत आहे, 3 लाख 25 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे आहेत, गजेंद्र राजपूत यांचे मुळ गाव आघोर ता.वैजापूर जि.छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील घरांची झडती घ्यायची आहे. या दोघांच्या आवाजाचा नमुना घेवून पुराव्यात समाविष्ट करायचा आहे. मोबाईल डाटा तपास करणे आहे यासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी द्यावी.
जवळपास 1 कोटी रुपये रोख रक्कम सापडली, 6 लाख 40 हजार रुपये किंमतीची लाच स्विकारली अशा परिस्थितीत सुध्दा आरोपींच्यावतीने पाच वकीलांनी भरपूर मेहनत घेवून हे प्रकरण पोलीस कोठडी देण्यासारखे नाही याचे सादरीकरण केले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी गजेंद्र राजपूत आणि विनोद कंधारे या दोघांना पाच दिवस अर्थात 7 नोव्हेंबर 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
कार्यकारी अभियंता रोहित तोंडले यांच्यासह सार्वजिक बांधकाम विभागाचे अनेक अभियंते, अनेक कर्मचारी अर्थात सार्वजनिक बांधकाम मंडळातील सर्वच अधिकारी आणि कर्मचारी, कार्यकारी अभियंता विभागातील अनेक अभियंते, अनेक कर्मचारी आपली आजची नोकरी सोडून सकाळपासूनच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर उभे होते. पुन्हा न्यायालयात आले ही घटना तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये उपलब्ध झाली आहे. एका भ्रष्टाचाराच्या आरोपीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यासाठी आपल्या विभागाची आजची नोकरी सोडून सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते आणि कर्मचारी न्यायालयात जाऊ शकतात काय? हा प्रश्न समोर आला आहे. यासोबत अनेक ठेकेदार न्यायालयात आणि बाहेर रस्त्यावर ठाण मांडून उभे होते. हे सर्व आपसात बोलत होते की, सायंकाळी आम्ही साहेबाला घरी घेवून जाणार आहोत पण न्यायाधीश बांगर यांनी आज आपला आदेश दिल्यानंतर एक-एक करून हळूहळू सर्व जण गायब झाले.
सबंधीत बातमी…..

https://vastavnewslive.com/2023/11/02/सार्वजनिक-बांधकाम-मंडळाच/

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *