28 हजार 220 रुपये किंमतीचा साठा नष्ट

▪️अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

नांदेड (जिमाका)- अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने अन्न पदार्थामध्ये भेसळ होवू नये म्हणून विक्रेत्यांना वारंवार आवाहन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने धडक कारवाई करुन कार्यवाही करण्याचेही निर्देश दिले आहेत.

त्याअनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने बाजारात विक्री होणाऱ्या दुधजन्य पदार्थाची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने 2 नोव्हेंबर रोजी मे. रामजी दत्तराव पवार यांचे दूध भांडार, देगलूर नाका, नांदेड या पेढीतून खवा व दही या अन्न पदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेवून तपासण्यात आले. त्यात खव्याचा उर्वरित साठा 69 किलो, किंमत 19 हजार 320 रुपये, तर दह्याचा उर्वरित साठा 178 किलो, किंमत 8 हजार 900 रुपये असा एकूण 28 हजार 220 रुपये किंमतीचा साठा त्यांनी जप्त केला. हा साठा भेसळीच्या संशयावरून तसेच अस्वच्छ वातावरणात साठवणूक केल्यामुळे नष्ट केला. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी अन्न सुरक्षा अधिकारी सतीश हाके यांच्या मदतीने सहायक आयुक्त संजय चट्टे व रामचंद्र भरकड यांच्या मार्गदर्शनाखाली केली, असे अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *