स्थानिक गुन्हा शाखेत जगदीश भंडरवार यांच्या आगमनानंतर पहिली जबरदस्त कामगिरी

नांदेड(प्रतिनिधी)-वयस्कर व्यक्तीला लॉटरी लागली आहे असे फोनवर सांगून त्यांची फसवणूक करणाऱ्या हैद्राबाद येथील पण सध्या नांदेडमध्ये राहणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हा शाखेने पकडले आहे. त्याच्याकडून 6 लाख 41 हजार 717 रुपयांचा फसवणूकीतील ऐवज जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे नुतन पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार आल्यानंतर पहिलीच कामगिरी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केली. आपल्याकडे आलेली माहिती पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांनी पोलीस निरिक्षक भंडरवार यांना देऊन त्या संदर्भाने शोध सुरू केला. नावघाट येथील संत दासगणु पुलाजवळ स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने राहुलसिंग मनोजसिंग जोगिया (24) मुळ रा.नामपल्ली हैद्राबाद सध्या राहणार वसरणी नांदेड यास ताब्यात घेतले. सन 2022 मध्ये हदगाव आणि नांदेड शहरातील वजिराबाद भागात पोलीस असल्याची बतावणी करून त्याने वयस्कर व्यक्तींची फसवणूक केली होती. सन 2023 मध्ये मुदखेड व लिंबगाव येथे वयोवृध्दांना लॉटरी लागली असे सांगून त्यांची फसवणूक केली होती. या ठकसेनाकडून पोलीसांनी 74 ग्रॅम सोन्याचे दागिणे, 70 तोळे चांदी, 3 मोबाईल आणि 1 दुचाकी गाडी असा 6 लाख 41 हजार 717 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपासासाठी सध्या या आरोपीला लिंबगाव पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे यांनी नुतन पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे, दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, संग्राम केंद्रे, मारोती मोरे, मोतीराम पवार, रणधिर राजबन्सी, ज्वालासिंग बावरी, बजरंग बोडके, किशन मुळे, गजानन बैनवाड, शेख कलीम या पथकाचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *