नांदेड(प्रतिनिधी)-सागर यादवचा खून दोन नंबरच्या व्यवसायातील स्पर्धेमुळेच झाला. जुगार अड्ड्यावर भांडण झाले ते जुना गंज भागात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर. त्यानंतर 2 तासात तुम्हाला वरच पाठवतो असे म्हणणाऱ्या केशव नहारेने आपल्या एकूण 23 साथीदारांसह इतर अनोळखी साथीदार मिळून सागरवर केलेला हल्ला हा फक्त एका व्यक्तीवर नसून तो समाजात दहशत माजविण्यासाठी होता असेच म्हणावे लागेल. याप्रकरणी सागरचे बंधू सोमनाथ यादव यांनी वास्तव न्युज लाईव्हला सांगितले की, इतवारा हद्दीतील जुगार अड्डे, मटक्याचे अड्डे बंदच होणे आवश्यक आहे नाही तर हे प्रकार पुढे आणखी घडतील आणि त्यातून समाजाचे नुकसानच होणार आहे.
काल दि.6 नोव्हेेंबरच्या रात्री 8 वाजेच्यासुमारास सराफा भागातील तिरुपती ज्वेलर्स, धुत चौक येथे हल्लेखोरांच्या मोठ्या जमावाने सागर प्रेमचंद रौत्रे (यादव)(वय 28) यास आणि त्यांचा बंधू मोनु उर्फ देवेंद्र जगनलाल गुरखुदे (34) यांना घेरले. एका थैल्यात भरून आणलेल्या अनेक तलवारी त्या हल्लेखोर जमावाने बाहेर काढल्या आणि मोनु रौत्रेवर सुरूवातीला हल्ला केला. मोनु रोत्रेने हल्लेखोराची तलवार आपल्या मुठीत पकडण्याचा प्रयत्न केला परंतू तलवार अत्यंत धार-धार असल्याने उजव्या हाताची पाचही बोटे कापल्या गेली. परंतू मोनु पळून गेला. त्यानंतर हल्लेखोर जमावाने सागरला घेरले आणि त्याच्यावर तलवारीने अनेक प्रहार केले. त्यात त्याच्या डोक्यावर डाव्या बाजूला मोठी जखम झाली आणि त्यातून रक्तप्रवाह जोरदारपणे वाहिला आणि सागर त्याच ठिकाणी खाली पडला. त्यानंतर नातलगांनी सागरला खाजगी रुग्णालयात नेले परंतू तो मृत झाल्याची बाब तेथेच त्यांना माहित झाली. परंतू पुन्हा त्याला शासकीय रुग्णालयात नेले आणि तेथील डॉक्टरांनी सागर यादवच्या मृत्यूची घोषणा केली.
याबाबत अभिमन्यु पुरणलाल मंडले (यादव) यांनी तक्रार दिली की, शनिमंदिराजवह राहणारा केशव नहारे उर्फ पवार हा सागरकडे आला आणि तुला डेलीनिडस आणि फायनान्सचा व्यवसाय करायचा असेल तर मला पैसे द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर केशव पवार विरुध्द पोलीस ठाणात तक्रार देण्याची चर्चा झाली परंतू तक्रार दिल्यानंतर पुन्हा नवीन वाद होईल असे ठरवून त्याला घरी पाठविले. रात्री 8 वाजता नगरेश्र्वर मंदिराजवळ राहणारे बंडेवार काका यांच्या वाढदिवस होता. तेंव्हा मी, मोनु उर्फ देवेंद्र गुरखुदे आणि सागर यादव सुध्दा आले. त्यावेळी होळी वरुन तिरुपती ज्वेलर्सकडे येणाऱ्या रस्त्यावरून अनेक दुचाकींवर 3-3 जण बसून आले आणि त्यातील हल्लेखोरांनी आम्ही के.बी.गॅंगची माणसे आहोत तुला माहित नाही काय? असे म्हणत घाण-घाण शिव्या दिल्या आणि तलवारीने मोनुवर हल्ला केला.त्याने तलवार हातात धरण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याची पाचही बोटे कापली गेली. हल्लेखोरांनी त्यानंतर सागर यादवला घेरले आणि त्याच्या शरिरावर तलवारीने भरपूर प्रहार केले आणि सागर खाली पडला.
अभिमन्यु मंडले यांनी दिलेल्या तक्रारीत आरोपी सदरामध्ये केशव नहारे उर्फ पवार, साई उर्फ साईनाथ नहारे पवार, केशव नहारे, गुप्पी महाराज, चिंग्या तरटे, दिपक पवार, आकाश लुळे, प्रितम सुभाष पवार, पप्या गजरवाड, प्रविण पवार, आदीत्य अजयसिंह गौर, अनिल पवार, संतोष सोळंके, किशन कुरील, विशाल रौत्रे, महाविर राजपुरोहित, रोहित बटावाले, ऋषभ वाघमारे, सय्यद अर्सनल सय्यद अजमल, कुणाल हटकर, करमजितसिंग बावरी, दिगंबर पाटील, अंकित कुरील अशी 23 जणांची नावे असून 24 क्रमांकावर इतर साथीदार असे तक्रारीत लिहिलेले आहे.
याप्रकरणी इतवारा पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 384, 386, 307, 294, 143, 146, 147, 148, 149 सोबत भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 नुसार गुन्हा क्रमांक 345/2023 दाखल केला आहे. खूनाचा प्रकार घडल्यानंतर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी तेथे पोहचले आणि खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास सर्वच संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास इतवाराचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे हे करत आहेत.
आज 7 नोव्हेंबर रोजी सकाळी मयत सागर यादवचे चुलत बंधू सोमनाथ यादव यांच्याशी भेट झाली तेंव्हा वास्तव न्युज लाईव्हला सांगत होते की, इतवारा हद्दीत सुरू असलेले जुगार अड्डे, मटक्याच्या बुक्या यामुळेच भांडणे होत आहेत. आज माझा युवा भाऊ मरण पावला आहे. हा प्रकार फक्त 2 नंबरच्या धंद्यांमुळेच घडलेला आहे. त्यासाठी आता तरी हा 2 नंबरचा प्रकार इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हद्दपार होणे आवश्यक आहे. काल घडलेला प्रकार जुना गंज भागात सुरू असलेल्या एका 52 पत्याच्या जुगार अड्ड्यावर घडला आणि त्या भांडणाचा परिणाम माझ्या भावाच्या खूनामध्ये झाला आहे.या जुगार अड्ड्यामध्ये दहा भागिदार आहेत असे सोमनाथ यादव सांगत होते. इतवारा हद्दीत मॅफ्को भागात सुध्दा मोठा जुगार अड्डा चालतो, इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक मटक्यांच्या बुक्या आहेत या सर्व बंद होणे आवश्यक आहे. घटना घडली तेंव्हाचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असतांना हल्लेखोर गटाने तलवारी हातात घेताच संपुर्ण सराफा भाग काही सेकंदात बंद झाला. ही दहशत समाजाविरुध्द आहे. आजच या दहशतीवर जरब आणला नाही तर ती पुढे वाढेल आणि असेच युवक त्या दहशतीचे बळी पडतील असे सोमनाथ यादव सांगत होते.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2023/11/06/जुगार-अड्ड्याच्या-भांडण/
सीसीटीव्ही फुटेज….