
नांदेड (प्रतिनिधी)-अनाधिकृत पध्दतीने, परवानगी न घेता बॅनर लावणाऱ्या संतांच्या कार्यक्रमांच्या बॅनरवर महामहानगर पालिकेने कार्यवाही केली. पण दिवाळी पहाट 2023 या बॅनरवर कोणताही परवानगीचा नंबर लिहिलेला नाही तरी हे बॅनर नांदेड शहरात झळकत आहे. बहुदा महानगरपालिका स्वत: आयोजक असल्यामुळे त्यांना परवानगीची गरज लागत नाही काय?, अशी तरतुद महाराष्ट्र नगर रचना अधिनियमांमध्ये आहे काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत .
जिल्हा प्रशासन, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, गुरूद्वारा बोर्ड व नागरी संस्कृती समिती नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी पहाट 2023 या कार्यक्रमाचे बॅनर शहरभर झळकत आहे. दि.12 नोव्हेंबरपासून ते 14 नोव्हेंबरपर्यंत या कार्यक्रमांचे आयोजन आहे. त्यामध्ये भक्ती भाव घाट, गदिमा एक गित यात्री, सुर दिपावली, हास्य फराळ, सांज दिवाळी, नृत्य झंकार, गोदेकाठी विठ्ठल मेळा आणि संयाती अशा कार्यक्रमांचे आयोजन आहे. 15 नोव्हेंबर रोजी कबिर वाणी या कार्यक्रमाणे दिवाळी पहाट 2023 चा समारोप होणार आहे.
शहरात बॅनर लावण्यासाठी महानगरपालिकेने स्वत: जागा निश्चित केल्या आहेत. त्या जागांवर विहित आकाराचे बॅनर लावण्यासाठी सुविधा देण्यात आल्या आहेत . ते बॅनर सुध्दा परवानगी प्राप्त हवे, त्या बॅनरवर परवानगी फिस भरल्यानंतर त्याचे मुद्रण बॅनरवर करणे बंधनकारक आहे. परंतू दिवाळी पहाट-2023 चे शहरात झळकलेले बॅनर महानगरपालिकेने विहित केलेल्या जागांवर तर नाहीच सोबतच महानगरपालिकेच्यावतीने विहित आकार सुध्दा या बॅनरवर बंधनकारक दिसत नाही. वजिराबाद चौक, डॉक्टर्सलेन या ठिकाणी झळकलेले हे बॅनर पाहिले असता कायदा हा इतरांना सांगण्यासाठी असतो तो स्वत: अंमलात आणायचा नसतो असेच चरित्र नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे दिसत आहे. संतांच्या कार्यक्रम बॅनरवर महानगरपालिकेने गुन्हा दाखल केला . पण या दिवाळी पहाट-2023 च्या बॅनर्सवर कोणत्याच प्रकारे कायद्यात नसतांना झळकलेल्या बॅनरवर कार्यवाही करण्यात आलेली नाही. अशा पध्दतीचे कामकाज जेंव्हा चालते त्यालाच लोकशाही दब्बर झाली असे म्हणतात.