धर्माच्या नावावर अनैतिकता करणाऱ्यांवर कोण वचक आणणार?

नांदेड(प्रतिनिधी)-धर्माच्या नावावर दुकानदारी चालविण्याचा प्रकार सध्या प्रत्येक धर्मात सुरू आहे. परंतू समाजातील बालकांना देशाचे भविष्य बनवून तयार करण्याची जबाबदारी असणाऱ्या काही लोकांनी केलेल्या या प्रकारामुळे या पुढे बालक-बालिका जन्मालाच घालू नयेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. नांदेड जिल्ह्यात तळणी तालुका उमरी येथे घडलेला नांदेड जिल्ह्यातील चौथा प्रकार आहे. असाच काहीसा प्रकार काही दिवसांपुर्वी लातूरमध्ये पण घडला होता. मौलाना असलेल्या व्यक्तींनी केलेले हे प्रकरण समाजाला पुन्हा एकदा जगण्यावर विचार करण्यास लावणाऱ्या घटना आहेत.
तीन दिवसांपुर्वी तळणी ता.उमरी जि.नांदेड येथे एका मदरसात कार्यरत असलेल्या मौलाना विरुध्द उमरी पोलीस ठाण्यात अल्पवयीन बालिकांवर अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. हा नांदेड जिल्ह्यातील चौथा प्रकार आहे. यापुर्वीच्या मौलानांवर गुन्हा दाखल झाला तेंव्हा त्यांच्याच समाजातील काही लोकांनी न्यायालयात त्यांच्यावर चपली भिरकावल्या होत्या. परंतू तळणी येथील मौलाना पळून जाण्यास यशस्वी झाला.उमरी पोलीस त्याच्या घरी निजामाबाद (तेलंगणा) येथे पण गेले होते. परंतू तेथूनही तो आपल्या कुटूंबाच्या मदतीने फरार होण्यात यशस्वी झाला. काय घ्यावे या भविष्याला शिकवणाऱ्या व्यक्तींकडून हा प्रश्न आता समाजाला पडला आहे. हा प्रकार फक्त मदरसांमध्ये होतो असे नाही आज ही आसाराम बापू, नित्यानंद, बाबा राम रहिम अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी धर्माच्या नावावर आपले काहीच बिघडू शकत नाही या मस्तीमध्ये धर्माने सांगितलेल्या आचरणाला केराच्या टोपलीत टाकून आमचे काहीच वाकडे होत नाही अशा पध्दतीने वागले. बाबा राम रहिमबद्दल तर फक्त पंतप्रधानांना आलेल्या एका पोस्ट कार्डवरुन त्याच्या झालेल्या चौकशीनंतर आज सध्या तो बाबा तुरूंगात आहे. नांदेडमध्ये घडलेल्या प्रकारातील पुर्वीचे तीन सुध्दा अद्याप तुरूंगातच आहेत. चौथा तळणी येथील मौलाना मात्र पळून गेला आहे. परंतू म्हणतात ना की, कायद्याचे हात सर्वात लांब असतात म्हणून मौलाना कुठपर्यंत जरी पळाला तरी कायद्याच्या कचाट्यातनू निघणे अवघड आहे.
काही दिवसांपुर्वी लातूर शहरात सुध्दा असाच एक प्रकार घडला. ज्या प्रकाराचा इतर मौलांनांनी सुध्दा विरोध केला, जनतेने त्या मौलाना ईस्माईल काझमीला मारहाण केली. त्याला अटक झाली. सध्या तो तुरूंगात आहे. 2 वयस्क विरुध्द लिंगांच्या लोकांना कायद्याने आपसात संबंध ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. पण एखाद्या महिलेसोबत कोणत्याही कारणाने तिच्याशी सलगी करून तिच्यावर अत्याचार करणे हा गुन्हाच आहे. लातूर येथील मौलाना ईस्माल काझमीने अत्याचार केलेल्या महिलेचे वय 21-22 असेल. मौलाना ईस्माईल काझमी ज्या धर्माचे शिक्षण देतो त्यात सुध्दा इतर महिलेशी शरिर संबंध ठेवणे चुकीचे मानलेले आहे. तरी पण असे का घडते आहे हा विचार करू तेंव्हा बालक-बालिकांच्या कुटूंबाने त्यांच्याकडे न दिलेले लक्ष कारणीभुत असेल असे म्हणावे लागेल. लातूरवाल्या मौलानाविरुध्द सन 2016 आणि 2019 या काळात सुध्दा लाबजना येथील बालिकांच्या मदरसामध्ये अनेक प्रकार झाल्याचे प्रकरण डॉ.शेख ताहेर यांनी समोर आणले होते. परंतू पुढे फिर्यादी फितूर झाली आणि पुन्हा ती दुकानदारी सुरूच झाली. त्यात काही पालक आपल्या बालकांच्या जेवणासाठी दिवस-रात्र मेहनत करतात. त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही. काही पालक आपल्याच खाण्या-पिण्यात मग्न असतात, आपली मजा करण्यामध्ये व्यस्थ असतात त्यामुळे त्यांना मुलांकडे लक्ष ठेवण्यास वेळ नाही अशा या परिस्थितीत समाजातून काय पुढे येईल.
ज्या पालकांनी आपल्या बालकांना जन्म दिला आहे. त्यांनी बालक-बालिकांशी इंत्यंभुत माहिती ठेवणे आवश्यक आहे. तरच अशा प्रकारांना आळा बसेल. काही ठिकाणी धर्माच्या नावावर धर्माविरुध्द काम करणारी काही मंडळी आहेत. आणि ज्यामुळे त्या धर्माचे नाव बदनाम करता येणार नाही. मदरसांचा विचार करू तेंव्हा त्यावर कोणाचे नियंत्रण आहे, त्याला कोण जबाबदार आहे याची दक्षता यानंतर तरी व्हावी अशी अपेक्षा आहे. जेणे करून ज्या बालकांना अद्याप खेळण्यातील रेल्वे इंजिन पाहायला मिळाले नाही. त्यांना काय-काय पाहावे लागते आहे, काय-काय सहन करावे लागते आहे याचा विचार होणे गरजेचे आहे. नाही तर समाज अशाच पध्दतीने बरबाद होईल आणि पुढे सुध्दा होत राहिल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *