नांदेड(प्रतिनिधी)-ग्राम पंचायत वाडी नियमतुल्लापुर ता.मुदखेड येथील उपसरपंच आणि एका ग्राम पंचायत सदस्याला गायरान जमीनीवर अतिक्रमण केले म्हणून त्यांना पुढील कालावधीसाठी ग्राम पंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जारी केले आहेत.
मुदखेड तालुक्यातील वाडी नियमतुल्लापूर येथील निवडणुक झाल्यानंतर अवधुत तात्याराव खानसोळे यांनी उपसरपंच माधव किशन खानसोळे, सदस्य माणिका भुजंगा लिंबनवाड या दोघांनी गावातील गायरान जमीनीवर अतिक्रमण करून तेथे कच्चे बांधकाम बांधले होते अशी तक्रार केली. याबाबत त्यांनी त्या जमीनीववर झालेल्या अतिक्रमणाचे फोटो सुध्दा घेतले होते. पण वारंवार तक्रारी करून सुध्दा कोणीच त्याची दखल घेत नव्हते. म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी न्यायालयात क्रमांक 2021/जी.बी./डेस्क-1/ ग्रा.प.नि./अपील-29 या नुसार हे प्रकरण 22 फेबु्रवारी 2021 रोजी दाखल केले. या प्रकरणाचा निकाल 16 नोव्हेंबर 2023 रोजी लागला. त्याची सत्यप्रत 22 नोव्हेंबर 2023 रोजी वादी अवधुत तात्याराव खानसोळे यांना प्राप्त झाली. याप्रकरणात अवधुत तात्याराव खानसोळेच्यावतीने ऍड.सुभाष जाधव यांनी बाजू मांडली. माणिका भुजंगा लिंबनवाड आणि माधव किशन खानसोळे यांच्यावतीने ऍड.मिलिंद एकताटे यांनी काम पाहिले.
ग्राम पंचायत मधील गायरान जमीनीवर ग्राम पंचायत सदस्य किंवा त्यांचा कोणताही नातेवाईक शासकीय जमीनीवर अतिक्रमण करेल तर तो महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 च्या कलम 14 (ज-3) आणि 16 प्रमाणे अपात्र ठरवता येतो. याबाबत झालेल्या युक्तीवादामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांचा अहवाल जोडला आहे. ज्यामध्ये दोघा अतिक्रमण धारकांनी ते अतिक्रमण नियमित करण्यासाठी प्रस्ताव सादर केला नव्हता.अर्थातच त्यांनी अतिक्रमण केले आहे हे स्पष्ट झाले. म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पुढील कालावधीकरीता ग्राम पंचायत वाडी नियमतुल्लापुर ता.मुदखेड जि.नांदेड येथील उपसरपंच माधव किशन खानसोळे आणि सदस्य माणिका भुजंगा लिंबनवाड या दोघांना अपात्र ठरवले आहे.
ग्राम पंचायत वाडी नियमतुल्लापुर येथील उपसरपंच आणि एक ग्रामपंचायत सदस्य जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले