नांदेड(प्रतिनिधी)-सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी(श्रेणी-1) ने परवाना नुतनीकरणासाठी 10 हजार रुपयांची लाच स्विकारल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सहकार अधिकारी बाबुराव चत्रु पवार (54) यास ताब्यात घेतले आहे. याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्तलिहिपर्यंत सुरु होती.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार रिध्दी ऍग्रॉ वेअर हाऊसचे वॉचमन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मालकाने वेअर हाऊसचा परवाना नुतनीकरणासाठी त्यांना सहाय्यक निबंधक सोयायटी कार्यालय नायगाव येथे पाठविले. तेथे जाऊन तक्रारदाराने शासकीय फिस भरून बॅंकेचे चालान नायगाव येथे सहकार अधिकारी बाबुराव चत्रु पवार यांना आणुन दिले. तेंव्हा बाबुराव पवारने मालकाकडून 10 हजार रुपये घेवून ये तरच काम होईल असे म्हणत 10 हजारांची मागणी केली. मागीतलेले दहा हजार रुपये लाच आहे अशी खात्री झाल्यानंतर त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. दि.20 नोव्हेंबर रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यासाठी पंच आणि तक्रारदार यांना पाठविले तेंव्हा तुझ्या मालकाला घेवून ये असे पवार यांनी सांगितले. त्यानंतर आज दि.24 नोव्हेंबर रोजी तक्रारदाराचे मालक आणि तक्रारदार यांची भेट व्हावी म्हणून त्यांना नायगाव येथे पाठविले असता पंचांसमक्ष नुतनीकरण परवाना देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागणी करून 10 हजारांची लाच स्विकारतांना बाबुराव चत्रु पवार यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. वृत्तलिहिपर्यंत बाबुराव चत्रु पवार विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे, पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार, पोलीस निरिक्षक स्वप्नाली धुतराज, पोलीस अंमलदार गजेंद्र मांजरमकर, शेख रसुल, राजेश राठोड आणि प्रकाश मामुलवाड यांनी ही कार्यवाही केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक प्रिती जाधव ह्या करणार आहेत.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही माहिती देतांना जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तसेच त्याच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवर बोलणे असेल,ऑडीओ, व्हिडीओ असेल, एसएमएस असतील तसेच भ्रष्टाचार संबंधाने कांही माहिती असेल तसेच माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती प्राप्त झाली असेल तर याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी टोल फ्रि क्रमांक 1064(2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02426-253512 यावर माहिती देता येईल.
नायगावचा सहकार अधिकारी अडकला 10 हजारांच्या लाच जाळ्यात