नांदेड (प्रतिनिधी)-महात्मा कांबळे हे नाटक समाजातील खोट्या महात्मावर भाष्य करणारे होते. डॉ. सतीश साळुंके लिखित आणि डॉ. राम चव्हाण दिग्दर्शित महात्मा कांबळे हे नाटक महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या पाचव्या दिवशी सादर झाले. देउबाई शिक्षण प्रसारक मंडळ, नांदेडच्या वतीने सादर झालेलं हे नाटक समाजातील अनेक पैलूंवर ज्यात सामाजिक विषमता, तोतया समाजसेवक, नात्यातील विकृती, लंपट नेते, यांवर डॉ. सतीश साळुंके यांनी आसूड ओढले आहे. हळुवार फुलत जाणाऱ्या या नाटकात शोषित पिता, पुत्रांच्या देशप्रेमाचे अनोखे दर्शन आणि खोटी प्रतिष्ठा आणि संपत्ती मिळवण्यासाठी एखादा व्यक्ती किती खालच्या थराला जाऊ शकतो याचे चित्रण या नाटकातून होते.
या नाटकात गजानन पिंपरखेडे, डॉ. राजेंद्र पाटील, गोविंद जोशी, अरविंद गवळे, डॉ. शिवानंद बासरे,नेहा खडकीकर, अनुराधा पांडे, यांनी भूमिका साकारल्या तर संगीत – प्रमोद देशमुख, नेपथ्य – ऋषिकेश नेरलकर, प्रकाशयोजना – ज्योतिबा हनुमंत, वेशभूषा – पंकज शर्मा यांनी साकारली.
स्पर्धा यशस्वीतेसाठी समन्वयक दिनेश कवडे, सह समन्वयक किरण टाकळे, सुधांशू सामलेट्टी, शेजल क्रिपलानी हे काम पाहत आहेत.
आज दि. 27 नोव्हेंबर रोजी सिद्ध नागार्जुन मेडिकल असोसिएशन, नांदेडच्या वतीने इरफान मुजावर लिखित, रागेश्री जोशी दिग्दर्शित “नेकी” या नाटकाचे सादरीकरण होणार आहे.