
नांदेड(प्रतिनिधी)-आज जिल्हा पोलीस दलातून एक पोलीस निरिक्षक, एक पोलीस उपनिरिक्षक, दोन श्रेणी पोलीस उपनिरिक्षक, दोन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि एक पोलीस अंमलदार असे 7 जण सेवानिवृत्त झाले. आपल्या सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनात घरात जास्त डोक लावू नका अशी गोड समज पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सेवानिवृत्तांना दिली.
आज पोलीस निरिक्षक सुनिल भिमराव निकाळजे(नियंत्रण कक्ष), पोलीस उपनिरिक्षक माधव मष्णाजी वाडेकर(पोलीस ठाणे धर्माबाद), श्रेणी पोलीस उपनिरिक्षक प्रकाश भुजंगराव भालेराव (पोलीस ठाणे बिलोली), शंकर रेशमाजी केंद्रे (पोलीस ठाणे मुक्रामाबाद), सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गोविंद धारु चव्हाण(पोलीस मुख्यालय नांदेड), शिवाजी हवगीराव सोलापूरे (पोलीस ठाणे कंधार) आणि पोलीस अंमलदार सखाराम सुरजी पवार (पोलीस ठाणे हिमायतनगर) हे आपल्या विहित वयोमानानुसार पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले.याप्रसंगी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्व सेवानिवृत्तांना सहकुटूंब निरोप दिला.
याप्रसंगी बोलतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले की, आज सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार आपल्या कुटूंबियांसोबत येथे आले आहेत. त्या कुटूंबियांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहुन आम्हाला सुध्दा सुपूर्ती मिळते आहे. पोलीसांना नेहमी काम करून घेण्याची सवय असते, सुचना करण्याची सवय असते पण आता घरी गेल्यावर असे काही करू नका जेणे करून घरचे लोक म्हणतील की, तुम्ही जरा बाहेर जावून या. तुम्ही घरात जास्त डोक लावू नका. आपल्या जीवनाची एक दैनंदिनी तयार करा आणि त्यानुसार आपले जीवन जगा. काही बालकांना शिकवा, सामाजिक काम करा, वाचन करा, ज्या नातेवाईकांना भेटलो नाहीत तेथे जा, भारतातील अनेक ठिकाणे आहेत जी आपण कधी पाहिले नाहीत ते पाहायला जा, अनेकदा आपण जवळच्या व्यक्तीच्या कार्यक्रमांना गेलेलो नाहीत त्यांच्याकडे जा, त्यांना भेटा.परंतू आता तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला जा, मुलांना, सुनबाईंना जास्त त्रास देऊ नका, आरोग्याची काळजी घ्या, तुम्ही आमच्या कुटूंबाचे भाग होतात, पुढेही राहणार आहात, आम्हाला कधी अडचण आली तर आम्ही तुम्हाला नक्कीच आवाज देवू तेंव्हा तुम्ही सुध्दा त्वरीत प्रतिसाद द्या.
या कार्यक्रमात पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे, आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, सहाय्यक पोलीस निरिक्षक, जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे, पत्रकार यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल कत्ते यांनी केले. पोलीस अंमलदार राखी कसबे आणि विनोद भंडारे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.


