
नांदेड(प्रतिनिधी)-काही दिवसांपुर्वी एका महिला पोलीस उपनिरिक्षकाला लुटल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलीसांनी रस्त्यावर लुट करणाऱ्या 11 जणांची नावे उघड झाली आहेत. त्यातील सात जणांना पोलीसांनी पकडले आहे. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. यांना पकडल्यानंतर एकूण 4 गुन्ह्यांची उकल झाली आहे अशी माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आज पोलीस अधिक्षकांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, इतवाराचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार आणि सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीधर जगताप यांची उपस्थिती होती. याप्रसंगी माहिती देतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले जनतेने थोडीशी दक्षता बाळगण्याची गरज आहे. छोट्या-छोट्या घटनांकडे, एखाद्या व्यक्तीच्या हालचालीकडे पाहुन संशय येत असेल तर तो आम्हाला कळवा. आम्ही त्यासाठी तुम्हाला मदत देण्यासाठी तत्पर आहोत. विशेष करून 15 ते 22 या वयोगटातील युवकांकडे पालकांनी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. कारण पोलीस प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवू शकत नाही. त्यासाठी पोलीसांना जनतेने सहकार्य करण्याची गरज आहे. सिडको भागात सोनाराची बॅग लुटणाऱ्या चोरट्यांचा शोध आम्ही लावला असून ती मंडळी महाराष्ट्रा बाहेरची आहे. त्यांनाही आम्ही लवकरात लवकर जेरबंद करू. ज्या गुन्हेगारांना पकडले. त्या गुन्हेंगारांकडे सापडलेल्या बंदुकांविषयी बोलतांना अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार म्हणाले की, एम.पी. व इतर राज्यांमध्ये बंदुका बनविण्याचा व्यवसाय हा कुटीर उद्योगाप्रमाणे सुरू आहे. इंग्रजांच्या काळात या भागात हत्यारांचे कारखाने होते. त्यावेळेसचे आपले कौशल्य त्या लोकांनी आपल्या पुढील पिढीला वंश परंपरागत पध्दतीने दिले आहे आणि म्हणूनच हा बंदुका बनविण्याचा कारभार किंबहुना त्यातील कौशल्य त्या लोकांना वंश परंपरेने मिळाले आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडलेल्या चोरट्यांमध्ये आनंदा उर्फ चिन्नु सरदार यादव (23) रा.वजिराबाद चौक, रोहित विजयकुमार कदम(20) रा.विष्णुपूरी, रवि उर्फ रवि लाला नारायणसिंह ठाकूर (33) रा.गाडीपुरा, कृष्णा पिराजी गायकवाड (24) रा.धनगरवाडी, प्रविण एकनाथ हंबर्डे(20) रा.विष्णुपूरी यांच्याकडून पोलीसांनी दोन अग्नीशस्त्र, तीन जिवंत काडतूस, तीन खंजीर, एक लोखंडी तलवार, एक लोखंडी कत्ती आणि चोरी करण्यासाठी वापरलेल्या दोन दुचाकी गाड्या असा 2 लाख 35 हजार 900 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.याबाबत सध्या भारतीय शस्त्र कायद्यानुसार या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरिक्षक महेश कोेरे आणि पोलीस अंमलदार सुनिल गटलेवार अधिक तपास करीत आहेत. ही मंडळी सध्या पोलीस कोठडीत आहे.
या दरोडेखोरांसोबत इतर त्यांचे साथीदार रोशन गोपाळ पद्दमवार रा.विष्णुपूरी, हरीश देवीदास शर्मा रा.वजिराबाद, परमेश्र्वर बबन कंधारे रा.विष्णुपूरी, विशाल उर्फ पप्पु नारायण हंबर्डे रा.विष्णुपूरी, रुपेश बालाजी ठाकूर रा.विष्णुपूरी, शेख जावेद उर्फ लड्ड्या रा.विष्णुपूरी या सर्वांनी मिळून हे गुन्हे केल्याचे समजले आहे. 9 आरोपींकडून मिळून 3 तोळे सोन्याचे दागिणे, तीन मोबाईल असा चोरट्यांनी लुटलेला ऐवज जप्त करण्यात आला आहे. या चोरट्यांनी नांदेड ग्रामीणमध्ये केलेल्या चोऱ्या आणि दरोडे तसेच सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेला एक दरोडा असे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी इतवाराचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, नांदेड ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीधर जगताप, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार, पोलीस अंमलदार विक्रम वाकडे, संतोष जाधव, ज्ञानोबा कवठेकर, शेख सत्तार, अर्जुन मुंडे, संतोष बेल्लूरोड, श्रीराम दासरे, माधव माने, शिवानंद तेजबंद, शिवानंद कानगुले आदींचे कौतुक केले आहे.