नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीयकृत बँकांच्या 25 नव्या शाखा उघडाव्यात, अशी मागणी नांदेडचे भाजपा खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय अर्थमंत्री ना.डॉ.भागवत कराड यांच्याकडे केली आहे. खा.चिखलीकर यांनी दिल्ली येथे अर्थ राज्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदरील निवेदन दिले आहे.
नांदेड हा मराठवाडा विभागातील अत्याधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. आणि शैक्षणिक व व्यावसायिक प्रतिष्ठानांचे मोठे कार्यस्थळ आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रीयीकृत बँकांच्या पुरेशा शाखा नाहीत मी मतदारसंघात दौरे करीत असतांना विविध वर्गाकडून सातत्याने ही बाब माझ्या निदर्शनास आणली जाते. व्यापारी, शेतकरी व शिक्षण संस्थेतील संबंधितांचा व्यापक व्यवहार ग्रामीण भागातून होत असतो. केंद्र शासनाची किसान क्रेडिट कार्ड योजना सुद्धा कार्यान्वित असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या जवळपास बँकेची निकड भासत असते. त्यामुळे ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकांच्या नव्या 25 शाखा वेगवेगळ्या ठिकाणी सुरू केल्याने शेतकरी, व्यापारी, शैक्षणिक संस्थांबरोबरच नागरिकांनाही आर्थिक व्यवहार करणे सोयीचे होईल आपण या मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व संबंधित विभागांना निर्देशित करावे, असे सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे. खा.चिखलीकर यांच्या या मागणीची अर्थ मंत्री तातडीने दखल घेतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीयकृत बँकांच्या 25 शाखा उघडाव्यात; खा.चिखलीकर यांचे केंद्रीय राज्यमंत्री यांना निवेदन