
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याच्या भौगोलिकदृष्ट्या केंद्रस्थानी येणाऱ्या नरसी-नायगाव येथे येत्या 7 जानेवारी 2024 रोजी ओबीसीचा महामेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती ओबीसी नेते डॉ.बी.डी.चव्हाण, ऍड.अविनाश भोसीकर, महेंद्र देगमगुंडे, माऊली गिते, नागनाथ स्वामी आदींनी पत्रकार परिषदेत दिली. या ओबीसीच मेळाव्याचे विशेष सांगतांना बी.डी. चव्हाण यांनी सांगितले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरमय्या आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना सुध्दा आम्ही बोलावणार आहोत.
ओबीसी मेळाव्याच्या पुर्व तयारीची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत डॉ.चव्हाण बोलत होते. वेगवेगळ्या जागी ओबीसीचे मेळावे झाले आहेत. परंतू नांदेड जिल्ह्यामध्ये ते व्हावेत यासाठी ही तयारी सुरू आहे. या मेळाव्यात छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, विजय चौगुले, विनय कोरे, महादेव जानकर, इंद्रनिल नाईक, जयजगदीश क्षीरसागर, बबनराव तायवाडे, गोपीचंद पडळकर, चंद्रकांत बावनकुळे, लक्ष्मण गायकवाड, मच्छींद्र भोसले, लक्ष्मणराव हाके, सखाराम पाटील, विजय वड्डेटीवार आदी नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सांगितली.
वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकर यांना धन्यवाद देत डॉ.चव्हाण म्हणाले की, त्यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षण मिळू शकत नाही आणि कोणी त्यांना मागूही नये आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांना सुध्दा आम्ही आमच्या मेळाव्यात बोलवण्याचा प्रयत्न करणार आहोत. 60 ते 70 एकर जागेवर नरसी येथे बिलोली रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे हा ओबीसी मेळावा होणार आहे अशी माहिती अविनाश भोसीकर यांनी दिली. यासह भोकर, मालेगाव, माहूर येथे सुध्दा ओबीसी मेळाव्यांचे नियोजन करणार आहोत. आमचा कोणत्याही समाजाच्या आरक्षणासाठी आक्षेप नाही. परंतू आमचे आरक्षण सुरक्षीत राहावे यासाठी आम्ही हा मेळावा बोलावलेला आहे असे ऍड.भोसीकर यांनी सांगितले. या मेळाव्यात जवळपास 3 ते 4 लाख लोक उपस्थित राहतील असे भोसीकर सांगत होते.
हरीभाऊ राठोडबद्दल बोलतांना डॉ.बी.डी.चव्हाण म्हणाले एकही ओबीसी ज्या व्यक्तीच्या मागे नाही त्यांनी उगीचच वल्गना करू नये.आपला फार्मुला आपल्याकडेच ठेवावा. तुम्ही ज्या पध्दतीने काम करत आहात त्या पध्दतीनुसार प्रकाश राठोड यांनी तुमचे पुतळे जाळण्याचे जाहीर केलेले आहे. काही लोक मॅनेज झालेले आहेत आणि ते ओबीसींना वेगवेगळे मार्ग दाखवत आहेत.अशा परिस्थितीत हरीभाऊ राठोड यांनी आमच्यामध्ये येण्याची काही गरज नाही असे डॉ.चव्हाण म्हणाले. त्यांना वाटत असेल तर हरीभाऊ राठोड यांनी स्वत:ची जात बदलून घ्यावी असेही डॉ.चव्हाण म्हणाले.