नांदेड(प्रतिनिधी)-माहुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 17 वर्षाच्या अल्पवयीन बालिकेचा हात धरुन तिला बलात्कार करेल अशी धमकी देणाऱ्या 25 वर्षीय युवकाला विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश आर.एम.पांडे यांनी सहा महिने सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
माहुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 17 वर्षीय अल्पवयीन बालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार 9 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी ती शेतात जात असतांना रस्त्यात पवन रमेश राठोड (25) याने तिचा हात धरुन तु मला का बोलत नाहीस असा प्रश्न विचारला. त्यावेळेस बालिका निघून गेली. परत 20 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 8 वाजेच्यासुमारास ती घरी एकटी असतांना पवन राठोड तिच्या घरी आला आणि वाईट उद्देशाने तिचा हात धरुन तु मला बोलली नाहीस तर मी तुझ्यावर बलात्कार करेल अशी धमकी दिली. या बालिकेच्या तक्रारीनंतर माहुर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 354(अ), 354(ड)(1), 341, 506 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 8 प्रमाणे गुन्हा क्रमांक 174/2020 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक भालचंद्र तिडके यांनी केला. पवन रमेश राठोडला 28 नोव्हेंबरला अटक झाली. न्यायालयात हा विशेष खटला क्रमांक 23/2021 प्रमाणे चालला. या खटल्यात उपलब्ध झालेल्या पुराव्याच्या आधारावर न्यायाधीश आर.एम.पांडे यांनी पवन रमेश राठोडला 6 महिने सक्त मजुरी आणि 2 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने ऍड.एम.ए.बत्तुला (डांगे) यांनी बाजू मांडली. या प्रकरणात पोलीस अंमलदार किशोर मेडपलवार यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.
अल्पवयीन बालिकेचा हात पकडून बलात्काराची धमकी देणाऱ्या युवकाला सक्तमजुरी