मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त खुरगावला विविध कार्यक्रम

१९ डिसेंबर रोजी श्रद्धा काॅलनीतील बौद्ध उपासिकांकडून भव्य भोजनदान
नांदेड(प्रतिनिधी) – मार्गशीर्ष पौर्णिमेला बौद्ध धम्माशी संबंधित दोन महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना म्हणजे परिव्राजक सिद्धार्थ गौतम व राजा बिंबिसार यांची भेट झाली.‌ दुसरी घटना देवदत्ताने बुद्धाला मारण्यास सोडलेल्या नालागिरी हत्तीवर बुद्धाचा विजय झाला. यामुळे या पौर्णिमेला महत्त्व प्राप्त झाले आहे.‌ तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात १९ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त ‘पौर्णिमोत्सव’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शहरातील श्रद्धा काॅलनीतील बौद्ध उपासिकांकडून भव्य भोजनदान होणार असून
 सकाळी ११ वा. ‘बाबासाहेब पाहिलेला माणूस’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.
            ऋषीपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात महिन्याच्या दर पौर्णिमेला दस दिवशीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येते. ३६५ दिवस चालणाऱ्या व २४ तास श्रामणेर दिक्षेकरिता सुरू राहणाऱ्या या केंद्रात जिल्हा, जिल्हा परिसर आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांतून उपासक दीक्षा घेण्यासाठी येत असतात. १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात बाबासाहेब पाहिलेला माणूस या विषयावर मान्यवर बोलणार आहेत. सकाळपासूनच सुरू होणाऱ्या कार्यक्रमात धम्मध्वजारोहण, परित्राणपाठ, त्रिरत्न वंदना, गाथापठण, भोजनदान, आर्थिक दान, औषधी तथा विविध वस्तूंचे दान, धम्मदेसना, बुद्ध भीम गितांच्या गायनाचे कार्यक्रम होणार आहेत. या निमित्ताने कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *