नांदेड(प्रतिनिधी)-26 जून रोजी एका महिलेच्या गळ्यातील गंठण तोडून पळू गेलेल्या दोन जणांची तपासणी केली असता वजिराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या कार्यवाहीत एका युवकाकडून 46 हजार 800 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तर दुसऱ्या एकाकडून 74 हजार 97 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यातील एक चोर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे. तर एकाला मुख्य न्यायादंडाधिकारी योगेशकुमार राहगंडाळे यांनी 22 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.26 जून रोजी रेखा सुरेश इंगोले या आपल्या नवऱ्यासोबत दुचाकी गाडीवर खडकपुरा भागातून येत असतांना दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण तोडून पळ काढला होता. याबाबत गुन्हा क्रमांक 200/2021 दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे यांच्याकडे देण्यात आला होता.
18 जुलै रोजी पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे , अब्दुल रब, प्रविण आगलावे, पोलीस अंमलदार दत्तराम जाधव, गजानन किडे, मनोज परदेशी, संतोष बेल्लूरोड, चंद्रकांत बिरादार, शरदचंद्र चावरे, व्यंकट गंगुलवाड, शेख इमरान, बालाजी कदम यांनी गोवर्धनघाट येथील हरिश उर्फ हऱ्या देविदास शर्मा (20) आणि शेख आरेफ उर्फ मादी शेख जाफर (19) रा.गोवर्धनघाट या दोघांची तपासणी केली असता शर्मा यांच्या घरातून 46 हजार 800 रुपयांचा चोरीचा ऐवज सापडला तसेच शेख आरेफ उर्फ मादी याच्या घरातून 74 हजार 97 रुपयांचा ऐवज सापडला. शेख आरेफने आणि हरीश शर्माने शेख आमेर उर्फ अमऱ्या याच्यासोबत मिळून नांदेडच्या वजिराबाद आणि नांदेड ग्रामीण या दोन ठिकाणी केेलेल्या दरोड्याचे गुन्हे उघडकीस आले. वजिराबाद पोलीसांनी शेख आरेफ उर्फ मादीला गुन्हा क्रमांक 233/2021 च्या तपाससासाठी नांदेड ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
वजिराबादच्या गुन्हा क्रमांक 200/2021 मध्ये हरिष उर्फ हऱ्या देविदास शर्मा यास मुख्य न्यायदंडाधिकारी योगेशकुमार राहगंडाळे यांनी 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठविल ेआहे. पोलीसकुमार प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी दोन गुन्हे उघडकीस आणणाऱ्या वजिराबादच्या गुन्हेशोध पथकाचे कौतुक केले आहे.
वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाने महिलेचे गंठण तोडणाऱ्या दोन चोरट्यांना पकडून 1 लाख 21 हजारांचा ऐवज जप्त केला