सुरज गुरव हा अष्टपैलू व्यक्ती-श्रीकृष्ण कोकाटे

नांदेड शहर उपविभागात नुतन सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका सी.एम.रुजू

नांदेड(प्रतिनिधी)-सुरज गुरव हा एक व्यक्ती नसून तो अष्टपैलू व्यक्ती आहे अशा शब्दात नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सुरज गुरव यांना आज निरोप दिला. त्यांच्या जागी किरितिका सी.एम. या नांदेड शहर उपविभागात सहाय्यक पोलीस अधिक्षक म्हणून रुजू झाल्या. त्याचे स्वागत करतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले की, नांदेड शहर डिव्हीजन ही पद भुषवणाऱ्या सर्वच अधिकाऱ्यांना सक्षम अधिकारी म्हणून गणले गेले आहे. आज ते सर्व अधिकारी मोठ-मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.
15 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात 10 आयपीएस लोकांना परिवेक्षाधिन कालावधी पुर्ण केल्यानंतर नियुक्ती देण्यात आली होती. त्या आदेशातच सुरज गुरव यांना राखीव ठेवण्यात आले होते. पण दोन दिवसांपुर्वी 15 डिसेंबरच्या आदेशातील सोलापूर जिल्ह्याच्या आकलूज उपविभागात नियुक्ती मिळालेल्या किरितिका सी.एम. ह्या नांदेडला हजर झाल्या. दरम्यान सुरज गुरव हे दोन मकोका प्रस्तावाची मंजुरी मिळविण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयात गेलेले होते. त्यामुळे आज सुरज गुरव त्यांच्या पत्नी सौ.संस्कृती मुले, रुद्र आणि सई यांच्यासह सुरज गुरव यांचा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, नुतन सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका सी.एम., पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आदींनी गुरव कुटूंबियांचा सन्मान केला.

सुरज गुरवने माझी तक्रार केली
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सुरज गुरवने माझ्या पत्नीकडे माझी तक्रार केली की, साहेबांना सांगा थोडा आराम करत जा. बाकी सर्व मी करून घेतो. आजही त्या तक्रारीला मला उत्तरे द्यावी लागत आहेत. माझी पत्नी मला सांगते की, तुमच्या अधिकाऱ्यांना त्यांचे काम करू द्या. तुम्ही थोडा आराम करत जा. आज सुरज गुरव जाणार आहेत परंतू ती माझी तक्रार सुरज गुरवने केली आहे ती माझ्या डोक्यावर कायमच राहणार आहे.

यानंतर भदंत पय्याबोधीजी, पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, उदय खंडेराय, सुर्यमोहन बोलमवाड, संतोष तांबे, संजय मारकड, सहाय्यक पोलीस निरिक्षक अश्रुबा घाटे, विलास जाधव, चंद्रकांत पवार,पांडूरंग माने, शिवाजी लष्करे, पोलीस उपनिरिक्षक राजेश डाकेवाड, दशरथ आडे, संतोष शेट्टे, दत्तात्रय काळे यांच्यासह नंदगिरीचे सर्व किल्लेदार, अनेक पोलीस अंमलदार यांनी सुरज गुरव यांचा सन्मान केला.
याप्रसंगी पुढे बोलतांना श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले की, आज आनंद आणि दुख असे दोन्ही क्षण एकदा आहेत. माझ्यासोबतचा एक वाघ मी सोडत आहे. परंतू काही दिवसांत त्याची पदोन्नती होणार आहे हा आनंदाचा क्षण आहे. आजच तो मुंबईवरून परत आला. त्याला मकोकाचे प्रस्ताव मंजूर करून आणण्यासाठी पाठविले होते. मी सुध्दा अपर पोलीस महासंचालक काही प्रश्न विचारतील म्हणून काही नोंदी करून ठेवल्या होत्या. परंतू सुरज गुरवने ती वेळच आणली नाही आणि दोन मकोकाचे प्रस्ताव मंजूर करून आणले आहेत. नंदगिरीच्या किल्यात युवकांच्या मदतीने काम करून पोलीस फक्त पोलीसच नसतात तर ते पोलीसींग शिवाय वेगळे काम करतात हे दाखवून पोलीसांची प्रतिमा उंचावली आहे. नांदेड जिल्ह्याचा पोलीस अधिक्षक म्हणून माझी सर्वात मोठी चिंता माझे अधिकारी आणि माझे पोलीस अंमलदार यांच्याकडून चुक होवू नये ही नेहमीच असते. परंतू सुरज गुरव आणि इतरांनी सुध्दा ही एक चिंता मला कधीच आणली नाही. तुमची वृत्ती चांगली आहे तर भविष्यात तुम्हाला उत्कृष्ट पदेच मिळतील आणि तुम्ही सक्षम अधिकारी म्हणून ओळखल्या जाणार अशा शुभकामना दिल्या.

गजानन उत्कृष्ट पोलीस
आपल्या स्वागताच्या उत्तरात बोलतांना सुरज गुरव म्हणाले की, माझ्या कार्यालयात पोलीस अंमलदार गजानन कदम यांनी मला कोणत्याही कागदोपत्री कामात अडचणच येवू दिलेली नाही. त्याला एक शब्द सांगितला तर तो त्या शब्दा मागची संपूर्ण ऐतिहासीक पार्श्र्वभूमी सांगत होता. मकोकाचे कागद तयार करणे हा सुध्दा एक अवघड प्रकार आहे तो गजानन कदम या कामात सुध्दा तरबेज आहे.

याप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार म्हणाले की, 7 महिन्याच्या छोट्याशा कालखंडात सुरज गुरवसोबत काम करून माझी अपेक्षा अशी आहे की, जीवनाच्या पुढील काळात आम्ही परत एकदा सोबत काम करावे. एक शिस्तबध्द अधिकारी म्हणजे सुरज गुरव अशी त्यांची प्रशंसा केली. पोलीसींग करणे हे काही रॉकेट विज्ञान नाही. प्रशासन करणे, जनतेशी योग्य भावाने वागणे, परिस्थिती गंभीर झाली तेंव्हा तुम्ही जमावाला कसे नियंत्रणात आणताल अशा काही कला ज्या अधिकाऱ्याला आल्या तो उत्कृष्ट पोलीस अधिकारी असतो आणि सुरज गुरव ह्या प्रत्येक कलेमध्ये पारंगत आहे.

तुला मिळालेला काळ तुझ्या भ्रमंतीसाठी
आपल्या भाषणात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे सांगत होते की, नांदेड शहर उपविभागात काम करतांना तुला आपल्या कुटूंबाला वेळ देता आला नाही. तुला निसर्ग जीवनात आवडते. आता पदोन्नती मिळण्यासाठी जो कालावधी लागणार आहे तो कालावधी तुझ्या भ्रमंतीसाठीच वापर.

याप्रसंगी बोलतांना सुशिलकुमार नायक म्हणाले मी आणि सुरज गुरव हे दोघे बॅचमेंट आहोत. मी येथे आलो तेंव्हा दोन महिने त्यांनीच इतवारा उपविभागाचा प्रभार सांभाळला. परंतू मी आल्यानंतर आम्ही दोघांनी मिळून नांदेड शहराला जी काही सेवा देता येईल ती दिलेली आहे. भदंत पय्याबोधीजी यांनी तुमचे नावच सुर्य आहे त्यामुळे तुम्ही जेथे जाणार तेथे तो प्रकाश आपल्या कर्तत्वाने उजळत ठेवाल असे आशिर्वाद दिले. याप्रसंगी भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुर्यमोहन बोलमवाड म्हणाले मी गुरव साहेबांसोबत पीएसआय या पदामध्ये बॅचमेंट आहे. त्यामुळे ते नांदेड शहरात आहेत म्हणूनच मी नांदेडला आलो. सुर्या हे शब्द वापरून साहेब मला आवाज द्यायचे त्यात त्यांनी एक घटना सांगितली की, ज्यामध्ये एक माणुस रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस ठाणे भाग्यनगरमध्ये आला आणि म्हणाला की, माझ्या मांडीत गोळी आहे तेंव्हा त्यांनी मला दवाखान्यात नेण्यास सांगितले परंतू मी त्यास बाहेर घेवून त्याची विचारणा करत होतो आणि गुरव साहेब बाहेर आले आणि मग माझी त्यांनी चांगलीच खरडपट्टी केली.


आपल्या सत्काराला उत्तर देतांना सुरज गुरव यांनी श्रीकृष्ण कोकाटे यांनी भिडणे शिकवले, अबिनाशकुमार यांनी पाठींबा दिला. पोलीस अधिक्षक प्रदीप देशपांडे आणि सुपेकर यांनी वागणे शिकवले. माझी पदोन्नतीची वेळ आली होती. म्हणून काही छोटीशी घटना सुध्दा माझ्या पदोन्नतीत अडचणी आणेल या भावनेने मी फुंंकून फुंकून पाय ठेवत होतो. मला पोलीस अधिक्षकांनी कधीच विरोध केला नाही. कारण मी त्यांच्यासोबत उदगीर उपविभागात काम केलेले आहे. उदगीरला दंगल झाली होती तेंव्हा मी साहेबांसाठी हेल्मेट घेवून जात असतांना एक दगड माझ्या पायावर लागला ते मला कोकाटे साहेबांची देण आहे असे सांगितले. मी माझ्या वरिष्ठांसोबत कधीच वाकडे करून घेत नाही. मी जगाशी पंगा घेईल पण वरिष्ठासोंबत त्यांनी आपल्यावर नाराज नाही झाले पाहिजे असाच वागतो. हजारो लोक समोर असतांना पळून जाणारा कधीच पोलीस असू शकत नाही. हे सांगतांना त्यांनी सांगितले की, माझी पदोन्नती होणार म्हणजे माझा साखरपुडा झाला आहे परंतू लग्न अद्याप झालेले नाही असा या पदोन्नतीचा उल्लेख केला. मी एका-दोन महिन्यात पदोन्नती मिळेल म्हणून नांदेडला आलो आणि पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे आहेत म्हणून जास्त रस दाखवला परंतू आज सात महिने होत आहेत. आज नाही तर उद्या मला लवकरच पदोन्नती मिळेल आणि मी श्रीकृष्ण कोकाटे यांना आनंद होईल असेच काम करेल. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन प्रा.संतोष देवराये यांनी केले.फुलांनी सजवलेल्या चार चाकी वाहनात सुरज गुरव आपल्या कुटूंबियांसाठी सत्कार समारंभानंतर घराकडे रवाना झाले.

तिरंग्या रंगांनी सजवला सभागृह
या कार्यक्रमाच्या आयोजनात सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार, पोलीस उपनिरिक्षक दशरथ आडे आणि संतोष शेकटे यांच्यासह त्यांच्या पोलीस अंमलदारांचा सहभाग दिसत होता. तिरंगा ध्वजातील तिन रंगांचे विविध फुगे तयार करून त्या फुग्यांंनीच व्यासपिठ आणि सभागृह सजविण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *