नांदेड(प्रतिनिधी)-बनावट कागदपत्रांच्या आधारावर संपत्ती बळकावण्याचे भयंकर प्रकार सुरू असून अशा व्यक्तींना जामीन दिला तर त्याचा परिणाम कायद्याने सुरक्षीत केलेल्या लोकांवर होईल अशी नोंद आपल्या निकालात करत अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी आमदार सुरेश वरपुडकर यांचे पूत्र समशेर वरपुडकर यांच्यासह तिघांचा जामीन नाकारला आहे. या जामीन प्रकरणात नांदेड येथील नोटरी ऍड.शेख जियाउद्दीन यांना मात्र सध्या तरी न्यायालयाने अंतरीम जामीन आदेश दिला आहे. शेख जियाउद्दीनविरुध्द काही दिवसांपुर्वीच हिंगोली शहर पोलीस ठाण्यात सुध्दा असा बनावट कागदपत्र बनविण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार सन 2017 पासून सुरू आहे. मग ते मुद्रांक तेंव्हा तयार झाले की, नंतर तयार करण्यात आले हाही प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.
पांडूरंग बालासाहेब कैलेवाड यांनी परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यात दि.17 डिसेंबर 2023 रोजी तक्रार दिली की,त्यांची संपत्ती औरंगाबाद येथील शेंद्रा वसाहतीत आहे आणि त्यांचे घर उस्मानपुरा येथे आहे. हे घर त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये सोबत काम पाहणारे स्वाती प्रकाश जाधव आणि त्यांचे पती प्रकाश सिरम जाधव यांच्याकडून विकत घेतले. पुढे या संदर्भाने फसवणूकीचा प्रकार असा घडला की, जाधव यांनी 75 लाख रुपये कंपनीत गुंतवायचा करार केला होता तो पाळला नाही म्हणून त्यांच्याविरुध्द औरंगाबाद शहरातील वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 9/2019 दाखल करण्यात आला. पुढे प्रकाश जाधवकडून खरेदी केलेले घर मी मनिष जैयस्वाल व मनिषा जैयस्वाल यांना विक्री केले.मला दिवाणी न्यायालय परभणीची नोटीस आली. त्यात मी हे घर शमशेर सुरेशराव वरपुडकर यांना विक्री केल्याचे लिहिले होते. अशा अनेक संपत्तीचे एकत्रीकरण करून नांदेड येथे नोटरी ऍड.शेख जियाउद्दीन लिहुन घेणार शमशेर सुरेशराव वरपुडकर, साक्षीदार सचिन प्रकाश देशमुख, रविंद्र ज्ञानोबा मेड या सर्वांनी आणि तसेच मुद्रांक विक्रेता त्यांचे जुने कंपनीतील साथीदार आणि इतर अशा 9 जणांनी मिळून बनावट मुद्रांक क्रमांक एस.व्ही.298277 आणि एस.व्ही.298278 यावर मी इसार घेतल्याची आणि ताबा दिल्याची माहिती नमुद आहे. त्यावर असलेली माझी स्वाक्षरी नाही.
या सर्व प्रकारामध्ये उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्रमांक 636/2019 मध्ये न्यायमुर्ती पी.बी.देबडवार आणि न्यायमुर्ती रविंद्र घुगे यांनी तक्रारदार अर्थात पांडूरंग बालासाहेब कैलेवाड यांना तक्रार देण्याची मुभा दिली. त्यानुसार त्यांनी नवा मोंढा परभणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 480/2023 दाखल केला. परंतू गुन्ह्यातील मुद्रांक कागद नांदेडला खरेदी केले. त्यावरचा अभिलेख नांदेडला लिहिला, त्यावर स्वाक्षरी करणारे नोटरी ऍड.शेख जियाउद्दीन हे नांदेडचे आहेत यासाठी नवा मोंढा परभणी पोलीस ठाण्याने हा गुन्हा नांदेड जिल्ह्याकडे वर्ग केला. नांदेड जिल्ह्यात हा प्रकार वजिराबाद पोलीस ठाण्यात घडलेला होता. म्हणून वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 560/2023 प्रमाणे दाखल झाला. त्यात भारतीय दंड संहितेची कलमे 420, 406, 465, 467, 468, 471, 120(ब), 34 अशी कलमे जोडण्यात आली. नांदेडच्या सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचा तपास वजिराबादचे पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे यांच्याकडे देण्यात आला.
दरम्यान शमशेर सुरेशराव वरपुडकर, सचिन प्रकाशराव देशमुख आणि रविंद्र ज्ञानोबा मेड यांनी नांदेडच्या जिल्हा न्यायालयात इतर किरकोळ जामीन अर्ज क्रमांक 946/2023 दाखल करून अटकपुर्व जामीन मागितला. या अटकपुर्व जामीन अर्जात प्रविण आगलावे यांनी दिलेला से आणि सरकारी वकील ऍॅड. यादव तळेगावकर यांनी केलेली मांडणी करतांना या प्रकरणात हस्ताक्षर नमुने घेणे आहे, विशेषज्ञाकडे कागदपत्रे पाठवायची आहेत. या संदर्भाने या तिघांची पोलीस कोठडीतील तपासणी आवश्यक आहे असे सांगितले हे सर्व बाबी लक्षात घेत अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी अशा प्रकरणांमध्ये अटकपुर्व जामीन दिला तर न्यायालयाकडून ज्या-ज्या बाबींसाठी सुरक्षा प्राप्त आहे त्याला मोठा धक्का बसेल अशी नोंद आपल्या निकालात करून शमशेर सुरेशराव वरपुडकर, सचिन प्रकाशराव देशमुख आणि रविंद्र ज्ञानोबा मेड या तिघांचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
परभणीचे आमदार सुरेश वरपुडकर यांचे पुत्र शमशेर आणि इतर दोघांना जमीन घोटाळा प्रकरणात नांदेड न्यायालयाने अटकपुर्व जामीन नाकारला