सागर यादव खून प्रकरणात तीन आरोपी स्थानिक गुन्हा शाखेने पुणे जिल्ह्यातून पकडले

एकूण सज्ञान आरोपी 24 आणि विधीसंघर्ष 8 असे 32 आरोपी अटकेत
नांदेड(प्रतिनिधी)-दि.6 नोव्हेंबर 2023 रोजी सराफा भागात झालेल्या सागर यादव या युवकाच्या खून प्रकरणातील तीन फरार आरोपी स्थानिक गुन्हा शाखेने पुणे जिल्ह्यातून पकडून आणले असून त्यांचे या भारदस्त कामाचे पोलीस अधिक्षकांनी कौतुक केले आहे.या प्रकरणात आता एकूण आरोपींची संख्या 32 झाली असून त्यातील 8 जण विधीसंघर्षग्रस्त बालक आहेत.
जुगार अड्डा चालविण्याच्या कारणावरून एका जन्मदिन समारंभात सहभागी झालेला सागर यादव आणि त्याचा भाऊ मोनु यादव या दोघांवर एका मोठ्या जमावाने शस्त्र हल्ला केला. शेकडो लोकांसमोर या खंडीभरांनी सागरचा खून केला आणि मोनु यादव जखमी झाला. याप्रकरणात आजपर्यंत 29 आरोपी अटकेत आहेत. स्थानिक गुन्हा शाखेतील दमदार फौजदार दत्तात्रय काळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्या हल्यातील तीन आरोपी चिंबळी ता.खेड जि.पुणे येथे असल्याची माहिती मिळाली. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेवून स्थानिक गुन्हा शाखेचे पथक पुणे जिल्ह्यात गेले आणि स्थानिक पोलीसांची मदत घेवून आकाश गोविंदराव लुळे (21) रा.तानाजीनगर नांदेड, दिपक अर्जुन पवार(21) रा.शिवनगर नांदेड आणि पप्पु शेषराव गजलवाड(20) रा.गोपाळनगर नांदेड यांना पकडून नांदेडला आणले. हे आरोपी विमानतळ पोलीस ठाण्याच्या एका शस्त्र अधिनियमानुसार दाखल झालेल्या एका गुन्ह्यात हवे आहेत.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे यांच्या मार्गदर्शनात अशी जबरदस्त कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार बालाजी तेलंग, विलास कदम, विठ्ठल शेळके, गणेश धुमाळ, गजानन बैनवाड, रणधिर राजबन्सी, सायबर सेलचे दिपक ओढणे, राजू सिटीकर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरिक्षक गणेश रायकर, पोलीस अंमलदार मोहम्मद नदाब यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *