नांदेड(प्रतिनिधी)-ठेवीदारांचे वित्तीय फायद्याचे अनेक आमिष दाखवून एका 26 वर्षीय युवकाने दुसऱ्या 27 वर्षीय युवकाला फसवूण त्याच्या बॅंक खात्यावर 70 लाख रुपये जमा करून घेवून त्याची फसवणूक केल्याचा प्रकार पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या हद्दीत घडला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
जयहिंद पार्क सिडको नांदेड येथे राहणाऱ्या शुभम मिलिंद टोम्पे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2024 दरम्यान लाभनगर मालेगाव रोड नांदेड येथे राहणाऱ्या श्रीकांत ज्ञानोबा गिते याने त्यास एका खाजगी कंपनीमध्ये रक्कम गुंतवली तर दर महिन्याला 1.48 टक्के एवढा नफा मिळेल आणि तुमचा करारनामा पुर्ण झाल्यानंतर तुमची मुळ रक्कम तुम्हाला पर देण्यात येईल असे आमिष दाखवून त्याच्या बॅंक खात्यावर 70 लाख घेतले. आजपर्यंत काहीच परतावा आला नाही तेंव्हा शुभम टोम्पेने विचारणा केली तेंव्हा श्रीकांत ज्ञानोबा गिते(26) हा त्याला आयकर विभागाची खोटी नोटीस दाखवून भिती दाखवायचा. दि.3 जानेवारी रोजी शिवाजीनगर पोलीसांनी श्रीकांत ज्ञानोबा गितेविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 409, 420, 467,468, 471, 506 सोबत महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999च्या कलम 3 आणि 4 नुसार गुन्हा क्रमांक 3/2024 दाखल केला आहे.
गुन्हा दाखल होताच हा गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला. पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक एच.एम.मिटके यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला. 3 जानेवारी रोजी आर्थिक गुन्हा शाखेने 70 लाखांची फसवणूक करणाऱ्या श्रीकांत ज्ञानोबा गितेला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यास 9 जानेवारी 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
लवकर आणि जास्त फायद्याच्या नादात 70 लाखांची फसवणूक ; आरोपी 9 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत