नांदेड़ (प्रतिनिधि)-अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 29 वर्षीय अनुसूचित जातीच्या महिलेची छेड काढणाऱ्याविरुध्द अर्धापूर पोलीसांनी ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील एक 29 वर्षीय महिला कधी बाहेर गावी जातांना तिच्या पाठीमागेच राहुन गाडीतून वर जातांना आणि खाली येतांना एक व्यक्ती केशव विश्र्वनाथ मगर (40) हा तिला नेहमी वाईट उद्देशाने धक्का देत असे. तिला फोन करून वडील आहेत काय? अशी विचारणा करून वडील घरी नसतील तर तिच्या वडीलांच्या टेलरींग दुकानावर येऊन काही काम नसतांना तिच्याकडे टक लावून पाहत असे. दि.3 जानेवारी सकाळी 11 वाजता ती महिला ग्रामसभेत बसली असतांना केशव विश्र्वनाथ मगर तिच्या बाजूला येऊन बसला आणि वाईट उद्देशाने एकटक पाहत होता. या तक्रारीवरुन अर्धापूर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (ड) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 च्या कलम 3(1)(डब्ल्यू), 1(2), 3(2)(व्ही.ए.) प्रमाणे गुन्हा क्रमांक 6/2024 दाखल केला आहे. पोलीस अंमलदाराच्या स्वाक्षरीनुसार हा गुन्हा तपासासाठी इतवारा पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशीलकुमार नायक यांच्याकडे देण्यात आला आहे.
अनुसूचित जातीच्या महिलेची छेड काढणाऱ्याविरुध्द अर्धापूर पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल