
नांदेड(प्रतिनिधी)-माळेगाव यात्रेमध्ये आजपर्यंतपेक्षा काही तरी नाविण्यपुर्ण करण्यासाठी मी माझ्या सर्व अधिकारी व यंत्रणेला सांगितले आहे त्यात विशेष करून माळेगाव यात्रेतून कायम स्वरुपी भौतिक सुविधा जास्तीत जास्त स्वरुपात कशा उभारता येतील, माळेगाव यात्रेत कचरा टाकण्यासाठी कायम उपाययोजना करण्यात येईल तसेच कायम शौचालयाची सोय पाणी पुरवठ्यासह करण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल आज पत्रकार परिषदेत यांनी दिली.
दि.10 जानेवारीपासून ते 14 जानेवारीपर्यंत नांदेड जिल्ह्यातील खंडोबाची यात्रा भरणार आहे. देवस्वारीच्या सुरूवातीपासून ही यात्रा प्रशासनिक स्तरावर चार दिवसांची असली तरी यात्रा जवळपास एक आठवडा चालते. जिल्हा परिषदेच्यावतीने यंदाच्या माळेगाव यात्रेसाठी 82 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. आजपर्यंत होणारे सर्व कार्यक्रम याही यात्रेत होतीलच अशी माहिती करणवाल यांनी दिली. वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांनी त्या-त्या विभागामार्फत काय-काय होणार आहे याची सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये कृषी विभाग, पशु विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि बचत गट या विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत काय केले जाणार आहे हे सांगितले. नेहमी प्रमाणे पशु प्रदर्शन, लावणी महोत्सव, परंपरागत कला महोत्सव असे सर्व प्रकार यंदाही होतील असे सांगण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल म्हणाल्या यंदाच्यावेळी घोड्यांची दौड करायची होती. परंतू त्याची तयारी होवू शकणार नाही. परंतू यात्रेतील वेगवेगळ्या विभागात मी 12 सफाई कर्मचारी नियोजित केले आहेत. यात्रेकरूंनी सुध्दा प्लॉस्टीकचा उपयोग न करता जास्तीत जास्त कापडांच्या पिशव्यांचा उपयोग करावा असे आवाहन केले. बचत गटाच्यावतीने तयार होणाऱ्या विविध उत्पादनांना माळेगाव यात्रेत स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत. यंदाच्या यात्रेत जवळपास सर्व विभागांचे मिळून 200 च्यावर स्टॉल असतील त्या माध्यमातून जनजागृती, कृषी उत्पादन्न, कृषी नियोजन, पशु संवर्धन, आरोग्याची काळजी या सर्व बाबींना लक्षात ठेवून यात्रेचे नियोजन केले आहे. पाण्याची नवीन पाईपलाईन टाकली आहे. दरवर्षी खर्च करून सुविधा तयार करण्यापेक्षा कायम सुविधा उपलब्ध करण्यावर माझा भर असून त्यासाठी मी कचरा साठविण्यासाठी ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा साठावा यासाठी कपे तयार केले आहेत. तसेच कायम शौचालय तयार व्हावेत तेही पाणी पुरवठ्याशिवाय याचेही नियोजन केले आहे. एखाद्या गरजेच्यावेळी रुग्णाला मदत म्हणून यात्रेच्या चौहू बाजूने रुग्णवाहिका तयार ठेवल्या आहेत. जवळपास 64 आरोग्य कर्मचारी यात्रेत दिवस रात्र सेवा देतील. नेहमीपेक्षा यंदाची यात्रा ही वेगळी दिसावी यासाठी मी प्रयत्न करत आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी विजय वड्डेटीवार, आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांची उपस्थिती होती.