नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत एक बनावट एटीएम कार्डचे प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विजयदादा सोनवणे यांनी त्याचा केलेला पाठपुरावा आज फोरेंन्सिक ऑडीटपर्यंत आला आहे असे आदेश विभागीय निबंधक सहकारी संस्था समृत जाधव यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना दिल्यानंतर जिल्हा उपनिबंधक विश्र्वास देशमुख यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ते आदेश पाठविले आहेत. परंतू राजकीय मंडळीचे वर्चस्व असलेल्या प्रस्तापितांच्या नावांचा घोळ यात उघडकीस येईल म्हणून आजही फोरेंन्सिक ऑडीट करतील की न करतील यावर शंकाच आहे.
सौ.निशा विजय सोनवणे यांच्या उमरी येथील बॅंक खात्यातून 19 हजार 800 रुपये बोगस एटीएमद्वारे काढून घेतल्याने हा घटनाक्रम पुढे आला. शेतीच्या झालेल्या नुकसानीबद्दल हे 19 हजार 800 रुपये जमा झाले होते. त्यावेळी पोलीस ठाणे उमरी येथे भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 468, 471 प्रमाणे गुन्हा नोंद झाला. परंतू आजतागयत त्या गुन्ह्याच्या तपासात प्रगती शुन्य आहे. उमरी शाखेचे बॅंक व्यवस्थापक एस.डी.राजपूत यांना निलंबित करण्यात आले. पण विजयदादा सोनवणे यांनी हा प्रकार अत्यंत गांभीर्याने घेतला. प्रश्न 19 हजार 800 रुपयांचा नाही तर शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे अनुदान असेच गायब झालेले आहे. शासनाकडे आणि इतर सक्षम ठिकाणी विजयदादा सोनवणे हे आपली तक्रार देत आहेत कारण नांदेड जिल्ह्यात नांदेड जिल्हा बॅंकेच्या 63 शाखा आहेत. या प्रत्येक शाखेमध्ये असे किती बोगस काढले गेले आणि त्यातून किती रक्कमेचा घोटाळा झाला यावर त्यांचा पाठपुरावा आहे.
विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर येथील अधिकारी समृत जाधव यांनी या घोटाळ्याला गांभीर्याने घेतले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक हे एक सक्षम प्राधिकरण आहे. म्हणून बॅंकेच्या डीजिटल आणि सायबर प्रणालीचे सक्षम यंत्रणेमार्फत फोरेंन्सिक ऑडीट करून घेण्याबाबतचा विषय बॅंकेच्या संचालक मंडळ सभेमध्ये घेवून फोरेंन्सिक ऑडीट करावे असे त्यांचे आदेश आहेत. येत्या 20 जानेवारी रोजी बॅंकेची सभा आहे. जिल्हा उपनिबंधक सुध्दा त्या बॅंकेचे सदस्य असतात. त्यांनी हा 63 बॅंक शाखांचा फोरेंन्सिक ऑडीटचा प्रस्ताव मांडला तर त्यावर मंजुरी पण मिळेल की नाही हे सुध्दा आता शंकेच्या भोवऱ्यात आहे. कारण जिल्हा बॅंकेच्या मालकीच्या जिल्ह्यातील विविध संपत्या आता विक्रीस निघाल्या आहेत त्याचा कोणाला फायदा आहे आणि तिच मंडळी या बॅंक घोटाळ्याच्यावेळी पदाधिकारी होती मग खऱ्या अर्थाने 63 बॅंक शाखांचा फोरेंन्सिक ऑडीट होईल काय या प्रश्नाचे उत्तर शोधणे अवघड आहे.
विभागीय सहनिबंधकांनी दिले नांदेड जिल्हा बॅंकेतील 63 शाखांच्या फोरेंन्सिक ऑडीटचे आदेश