स्थानिक गुन्हा शाखेने 1 लाख 8 हजारांचा गांजा पकडला ; तिन जण अटकेत

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात येणारा 1 लाख 8 हजार रुपये किंमतीचा गांजा स्थानिक गुन्हा शाखेने पकडला आहे. तीन जणांना पकडण्यात आले आहे. एक अजून पकडायचा आहे. एका निळ्या रंगाच्या बनावट पानटपरीमध्ये हा गांजा विक्री करण्यासाठी ठेवलेला होता.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांना मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगरच्या हद्दीत एका बनावट पानटपरीवर गांजा विक्री होत आहे. तेंव्हा त्यांनी अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यातील तरतूदीनुसार राजपत्रित अधिकारी, पंच, वजन काटा असे सर्व साहित्य घेवून स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय आणि पथकासह धाड टाकली. त्या बनावट पानटपरीमध्ये खाण्याचे पान विक्री होण्याऐवजी गांजा हा प्रतिबंधीत पदार्थ विक्री करण्याचा अड्डा होता. पोलीसांनी त्या ठिकाणवरून शेख अनिस, शेख सलीम रा.नई आबादी शिवाजीनगर नांदेड, शेख इमरान शेख अहेमद रा.तेहरानगर, भुजंग निवृत्ती जोंधळे रा.आंबेडकरनगर नांदेड या तिघांना पकडले. त्यांच्याकडून 1 लाख 8 हजार रुपये किंमतीची प्रतिबंधीत अंमलीपदार्थ गांजा जप्त केला. हा गांजा नई आबादी शिवाजीनगर येथे राहणाऱ्या हमीद खान गौस खाने याने विक्री करण्यासाठी दिलेला आहे असे तिघांनी सांगितले.
या प्रकरणी चार जणांविरुध्द अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे आदींनी एवढ्या मोठ्याप्रमाणात गांजा पकडणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, नायब तहसीलदार के.बी.डांगे, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, आनंद बिचेवार, बालाजी तेलंग, किशन मुळे, गजानन बैनवाड, विलास कदम, रणधिर राजबन्सी, धम्मानंद जाधव, राजू पुल्लेवार, शेख कलीम, दादाराव श्रीरामे आणि महिला पोलीस अंमलदार किरण बाबर यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *