7 वर्षीय बालकाच्या अपघातात मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या ऍटो चालकास 10 वर्षानंतर शिक्षा

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या ऍटोचे नियंत्रण संपवून ऍटो रस्त्याच्याकडेला धडकून उलटल्यानंतर पळून गेलेल्या ऍटो चालकाला 10 वर्षानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोनाली बिरहारी-जगताप यांनी 6 महिने सक्तमजुरी आणि 11 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या अपघातात एका 7 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता.
मोहम्मद बाबा मोहम्मद कासीम यांच्या द्वितीय क्रमांकाचा मुलगा फुर खान हा अलरिजवान इंग्लीश स्कुल येथे शिक्षकण्यासाठी जात असतांना दररोज एम.एच.26 एन.163 मध्ये प्रवास करत होता.या ऍटोचा चालक रियाज खान शब्बीर खान हा होता. 19 जुलै 2013 रोजी मोहम्मद बाबा हे आपल्या दुचाकीवरुन घरी जात असतांना शिवनगर मंदिर रस्त्यावर रेल्वे कार्यालयाच्या पश्चिम गेट जवळ एक ऍटो पलटलेला दिसला. मी त्या ऍटोमध्ये बालके आहेत पाहुन मदतीला गेलो त्या ऍटोमध्ये माझाही मुलगा होता. मी माझा मुलगा फुरखान (7) यास इतर लोकांच्या मदतीने दवाखान्यात नेले. पण दुर्देवाने तो वाचू शकला नाही. या घटनाक्रमात इतरही बालके जखमी झाली होती. विमानतळ पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 82/2013 भारतीय दंड संहितेच्या कलम 279, 304(अ) नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक रविंद्र श्रीरामवार यांनी केला. या घटनेचा पुर्ण तपास झाल्यानंतर रियाज खान शब्बीर खान विरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणी न्यायालयात सात साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. उपलब्ध पुरावा आधारे न्यायाधीश सोनाली बिरहारी-जगताप यांनी 7 वर्षीय बालकच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या रियाज खानला भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (अ), 279 आणि मोटार वाहन कायदा कलम 134/187 नुसार दोषी मानले.
कलम 279 साठी 15 दिवसांची सक्तमजुरी आणि 500 रुपये दंड, कलम 304(अ) करीता 6 महिने सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये रोख दंड, मोटार वाहन कायद्या कलम 134/187 साठी 10 दिवसांचा साधा कारावास व 500 रुपये रोख दंड यातील सर्व शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत परंतू दंड मात्र स्वतंत्र भरायचे आहेत. दंडाच्या रक्कमेतील 5 हजार रुपये फिर्यादी मोहम्मद बाबा यांना अपील कालावधी संपल्यानंतर द्यायचे आहेत. या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू ऍड.अजित डोनेराव यांनी मानली. पोलीस ठाणे विमानतळचे पोलीस अंमलदार रामदास सूर्यवंशी यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *