नांदेड येथील ऍड. चावरे, ऍड. हाके, ऍड.पाटील, ऍड. लोखंडे आणि ऍड. येगावकर यांचा समावेश
नांदेड (प्रतिनिधी) – सहायक सरकारी अभियोक्ता (गट-अ) या संवर्गातील 210 वकीलांना पदोन्नतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता (गट-अ) या पदावर पदोन्नत्या दिल्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने आज दि. 23 जुलै रोजी जारी केले आहेत. या आदेशावर विधी विभागाचे उपसचिव किशोर भालेराव यांची डिजीटल स्वाक्षरी आहे. या यादीमध्ये नांदेड जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालय सरकारी अभियोक्ता यांच्या पदोन्नतीबाबतच्या याचिकेवर महाराष्ट्र शासनावर नाराज होते. महाराष्ट्र शासनाला या संदर्भाने मागील आदेशांचे काय केले याबाबत 26 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करायचे आहे. या पार्श्वभुमिवर महाराष्ट्र शासनाने राज्यातील 210 सहायक सरकारी अभियोक्ता यांना पदोन्नती देऊन अतिरिक्त सरकारी अभियोक्ता या पदावर नियुक्त केले आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे.

नांदेड जिल्ह्यातील ऍड. सुनंदा चावरे,ऍड. बी.एम. हाके, ऍड. शैलजा पाटील, ऍड. रमेश लोखंडे आणि हदगाव येथे कार्यरत ऍड. अरविंद येगावकर यांचा समावेश आहे. नांदेड येथून मुंबई येथून बदलून गेलेले राजकुमार माचेवार यांचाही या यादीत समावेश आहे. 1997 पासून सुरू असलेल्या या लढ्याला आज खऱ्या अर्थाने यश आले. या लढ्याला सुरूवात करणारे असंख्य सहायक सरकारी अभियोक्ता आज सेवानिवृत्त झाले आहेत. पण त्यांनी घेतलेल्या मेहनतीला आज खऱ्या अर्थाने फळ मिळाले आहे.