नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्कुल ऑफ एज्युकेशन या विभागाचे प्रमुख प्रा.सिंकुकुमारसिंह यांच्याविरुध्द एका विद्यार्थीनीच्या तक्रारीनंतर ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
एका विद्यार्थीनीने दिलेल्या तक्रारीनुसार ती स्वारातीम मध्ये स्कुल ऑफ एज्युकेशन विभागात शिक्षण घेते. 17 ऑगस्ट 2022 ते 18 जानेवारी 2024 दरम्यान या विभागाचे प्रमुख प्रा.सिंकुकुमारसिंह यांनी वाईट उद्देशाने अनेक वेळेस तिचा हात धरुन तिचा विनयभंग केला आहे, तुम्हाला आरक्षण हवे असते, ताकत असेल तर सर्वसाधारण संवर्गात उतरा असे सांगून तिच्या जातीविषय प्राध्यापकाने चुकीच्या भावना व्यक्त केल्या.
प्रा.सिंकुकुमारसिंह यांनी बनारस हिंदु विद्यापीठातून शिक्षण घेतलेले आहे. त्यांनी आपल्या पीएचडीचे शिक्षण डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून घेतलेले आहे. दि.5 फेबु्रवारी 2009 पासून ते स्वारातीम विद्यापीठात कार्यरत आहेत. या संदर्भाने घडलेल्या प्रकाराबद्दल हा मुद्दा अकॅडमीक परिषदेमध्ये तातडीने घेण्यात यावा यासाठी प्रा.प्रबुध्द चित्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वारातीम मध्ये आंदोलन पण केले होते.
विद्यार्थीनीच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 354 आणि ऍट्रॉसिटी कायदाप्रमाणे गुन्हा क्रमांक 60/2024 दि.24 जानेवारी 2024 रोजी दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास ईतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्याकडे देण्यात आला आहे. पोलीसांना अद्याप प्रा.सिंकुकुमारसिंह सापडलेले नाहीत म्हणजेच ते गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाले आहेत असे लिहिले तर चुक ठरणार नाही.
स्वारातीमच्या विभागप्रमुखाविरुध्द विनयभंग व ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल