शहीद जवान महेंद्र आंबुलगेकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 कंधार(प्रतिनिधि)-जीआरईएफचे जवान महेंद्र आंबुलगेकर (वय ३६) यांच्या पार्थिवावर रविवारी, ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता मूळगावी मौजे आंबुलगा (ता.कंधार) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहीद जवान महेंद्र आंबुलगेकर यांना पंचक्रोशीतील हजारो जनसमुदायांनी अश्रूनयनांनी अखेचा निरोप दिला.
     तालुक्यातील मौजे आंबुलगा येथील महेंद्र बालाजी आंबुलगेकर हे अरुणाचल प्रदेशमधील जीआरईएफमध्ये कार्यरत होते. दरम्यान, कर्तव्यावर असताना बुधवारी, ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६.२५ वाजताच्या सुमारास वाहन खोल दरीत कोसळले. या अपघातात महेंद्र आंबुलगेकर यांचा मृत्यू झाला. महेंद्र आंबुलगेकर यांचे पार्थिव शनिवारी, ३ फेब्रुवारी रोजी अरुणाचल प्रदेश येथून विशेष विमानाने हैदराबाद येथे आणण्यात आले. रविवार, सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास बळीरामपूरच्या त्यांच्या घरी नेण्यात आले. त्यानंतर सकाळी १० वाजता कंधार येथे आणण्यात आले. पार्थिवाची कंधार शहरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ वाजता त्यांच्या मूळगावी आंबुलगा येथे पार्थिव आणण्यात आले. समाज मंदिराच्या प्रांगणात पार्थिव अंतिम अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. जवान महेश आंबुलगेकर यांचे पार्थिव पाहताच आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, मुले, मुलगी यांच्या अश्रूंचा बांध फुटला. तसेच नातेवाईकांना शोक अनावर झाला. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर सजलेल्या रथातून पार्थिवाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम्, महेंद्र आंबुलगेकर अमर रहे अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचली. यावेळी अनेक मान्यवरांनी शहीद जवान महेंद्र आंबुलगेकर यांना पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. त्यानंतर नांदेड पोलिसांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या तीन फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. त्यानंतर नातेवाईकांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. शहीद जवान महेंद्र आंबुलगेकर यांचे चुलते माधव देवकांबळे यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला.
     यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.तुषार राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष रामचंद्र येईलवाड, निवासी जिल्हाधिकारी महेश वडदकर, माजी सैनिक कल्याण अधिकारी अर्जुन जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे पाटील, उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर, कंधारचे प्रभारी तहसीलदार विठ्ठल परळीकर, मुदखेडचे तहसीलदार मुंगाजी काकडे, माजी जि.प.सदस्य मनोहर पाटील तेलंग, प्रा.डाॅ.पुरुषोत्तम धोंडगे, दशरथ लोहबंदे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर, माजी सैनिक विकास समितीचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक, नांदेड म.न.पा.च्या माजी नगरसेविका बेबीताई गुंडले, आनंदराव गुंडले, भाजपाचे उपाध्यक्ष भगवान राठोड, भाजपाचे तालुकाध्यक्ष किशनराव डफडे, भाजपा शिक्षक आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव, लोहा काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष शरद पवार, पानभोसी गावचे सरपंच प्रतिनिधी मनोहर पाटील भोसीकर, बोरी बु गावाचे सरपंच बालाजी झुंबाड, बळीरामपूर गावचे सरपंच इंद्रजित पांचाळ, माजी पं.स.सभापती प्रतिनिधी पंडितराव देवकांबळे, आंबुलगा गावचे सरपंच पांडुरंग मुसळे, उपसरपंच सचिन गुद्दे, पोलीस पाटील गणेश फुलारी, आंबुलगा से.स.सोसायटीचे चेअरमन बालाजी गव्हाणे, बालरोग तज्ञ डॉ.संजय केंद्रे, डॉ.गंगाधर तोगरे, कृषी सहायक संभाजी वडजे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अदित्य लोणीकर, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ इंद्राळे, माधव मुसळे, सतिश देवकत्ते आदींसह लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, नातेवाईक व पंचक्रोशीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *