शिवजन्मोत्सवानिमित्त जिल्ह्यात स्वराज्य सप्ताह -जिल्हाध्यक्ष दिलीप धर्माधिकारी

नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने राज्यभरात प्रदेश स्तरावर तसेच जिल्हा व तालुका स्तरावर राज्य रयतेचे -जिजाऊ शिवबांचे या निमित्त दि. 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या दरम्यान नांदेड जिल्ह्यामध्ये स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनही केले आहे, अशी माहिती नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्वराज्य सप्ताह आणि नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) यांची दि. 5 फेब्रुवारी रोजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांच्या अध्यखतेखाली महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये पक्ष संघटन, बुथ कमिटी, नवीन नियुक्त्या आदी संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांनी स्वराज्य सप्ताह कार्यक्रमाची माहिती दिली. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले रयतेचे राज्य व त्यामधील संकल्पना लोकांसमोर मांडली जावी. याकरीता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवरायांच्या रयतेचे राज्य या संकल्पनेतून शासन चालविण्याची प्रेरणा घेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत स्वराज्य पताका लावणे, तसेच नांदेड शहरातील नंदगिरी किल्ला कंधार येथील किल्ला येथे साफसफाई करणे, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, व्याख्याने, निबंध स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी नांदेडचे प्रभारी मंत्री धनंजय मुंडे हे येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. बुथ कमिटीसंदर्भात तालुकाध्यक्षांच्या सुचनेनुसार गठीत कराव्यात, असेही त्यांनी सुचित केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री कमलकिशोर कदम आणि तत्कालीन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या कार्यकाळात नांदेड जिल्हयात मोठ्या प्रमाणात आमदार आणि खासदार तसेच स्थानिक स्वराज संस्थेमध्ये राष्ट्रवादीचा वरचष्मा होता. हे गतवैभव प्राप्त करण्यासाठी सर्वांना विश्‍वासात घेऊन पक्ष संघटन वाढविले जाईल, असे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांनी सांगितले.
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सुनंदा जोगदंड, शहर कार्याध्यक्ष फेरोज पटेल, उमरी तालुकाध्यक्ष विक्रम देशमुख तळेगावकर, जिल्हाध्यक्ष सरचिटणीस शिवाजीराव धर्माधिकारी, संध्याताई शिंदे, उद्योग विभागाचे विभागीय अध्यक्ष श्रीधरराव नागापूरकर, युवकचे जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील मुकनर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब सोनकांबळे, एकनाथ वाघमारे, तालुकाध्यक्ष मनोहर भोसीकर, नायगाव तालुकाध्यक्ष प्रा. जीवन चव्हाण आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *