नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या एका नराधम युवकाने नशेत असतांना एका 9 वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्याचा केलेला प्रयत्न शेतातील आखाड्यावर सुदैवाने उपस्थित असलेल्या व्यक्तींमुळे वाचला. सोनखेड पोलीसांनी काही तासातच या नशेखोर युवका अटक करून त्याच्याविरुध्द भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्यातील कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांपुर्वीच मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून दोन जणांनी तिचा खून केल्याच्या घटनेची चर्चा पुर्णपणे थांबली नसतांना काल नवीन प्रकार समोर आला. सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावातील मारोती मंदिरात भंडाऱ्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात मोठ्या संख्येत महिला व पुरूष, युवक-युवती, बालक-बालिका उपस्थित होते. नांदेडच्या नमस्कार चौकात राहणारा 25 वर्षीय युवक बापुराव पाडदे हा त्याच्या मामाच्या गावात अर्थात ज्या गावात भंडारा सुरू होता त्या गावात आला होता. भंडाऱ्याचे जेवन करून 9 वर्षीय बालिका परत आपल्या घराकडे जात असतांना तिला एकटी पाहुन, चॉकेलेट देण्याचे आमिष दाखवून तुझ्या घरी सोडतो असे आमिष दाखवून बापूराव पाडदेने त्या बालिकेला आपल्या दुचाकीवर बसवले आणि इकडे-तिकडे फिरून शेताच्या दोन आखाड्यांच्यामध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पण तिला आपल्यावर येणारे अरिष्ठ कळले आणि तिने जोरात किंचाळण्यास सुरूवात केली. सुदैवाने त्या दोन आखांड्यांवरील काही व्यक्ती मारोती मंदिराच्या भंडाऱ्यात गेले नव्हते. म्हणून बालिकेचे किंचाळणे ऐकून त्यांनी आपल्या जवळील बॅटऱ्या लावून आखाड्याच्या बाहेर आले आणि त्यांना हा भयंकर प्रकार दिसला.बालिकेचे किंचाळणे आणि आखाड्यावरील व्यक्तींचे तिकडे येणे त्या बालिकेच्या जिवनासाठी जिवनदान ठरले. अत्याचार करण्याचा प्रयत्न करणारा बापुराव पाडदे पळून गेला.
सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने आणि त्यांचे सहकारी माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी काही तासातच बापूराव पाडदेला अटक केली. बापूराव पाडदेविरुध्द भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायदा प्रमाणे गुन्हा क्रमांक 19/2024 दाखल करण्यात आला आहे. बापूराव पाडदेला सोनखेड पोलीसांनी अटक केली आहे.
बालिकेवर अत्याचार करणारा बापूराव पाडदेला आज सोनखेड पोलीसांनी मुख्य न्यायदंडाधिकारी लोहा न्यायालयात हजर करून तपासाच्या प्रगतीसाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा मुद्दा मांडल्यानंतर न्यायाधीशांनी बापूराव पाडदेला दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. अल्पवयीन बालिकांवर होणाऱ्या या अत्याचाराची श्रृंखला थांबविण्यासाठी पालकांनी बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे अशी विनंती वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा करत आहे.