सेवालाल महाराज :- “एक क्रांतीवीर सेनानी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन असलेला विचारवंत”

भारतीय मध्ययुगीन काळामध्ये बहुसंख्य क्रांतीवीर विचारवंत होऊन गेले आहेत. त्यापैकीच मुलनिवासी बंजारा समाजामध्ये क्रांतीवीर सेवालाल महाराज जन्माला आले होते, त्याची 285 वी जयंती आपण साजरी करत आहोत.

“साल सतराशे एकोन्नचाळीस
दन सोमवार,
गुती बेल्लारीम बंब नंगारा घोर
आयीवाळो लिदो अवतार’

सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 मध्ये तांडा गुत्ती बेल्लारी अनंतपूर जिल्हा आंध्रप्रदेश या ठिकाणी झाला होता. रामावत कूळामध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांचे नांव भिमानायक व आईचे नांव धरमणी असे होते. सेवालाल महाराजांना तीन भावंडे होती. हापानायक, बदूनायक आणि पुरानायक अशी त्यांची नांवे होती.

क्रांतीकारी सेवालाल महाराज :-
“घोळी लगीरी शितळ छाया,
वोम बेटो सेवाआया,
हुबी दनिया अर्जी बोल मरीयामा माया,
तलवारेरी गंज पडीच नेम किदो सेवाभाया,
सेवाभाया यू कर बोलो, फेर लढायीन जाया”

भारतीय इतिहासामध्ये सेवालाल महाराज यांची ओळख एक क्रांतीविर सेनानी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन असलेला विचारवंत अशी आहे. क्रांतीकारी सेनानी त्यासोबतच विचारवंत असलेले फार दुर्मिळ तत्वज्ञानी भारतात होऊन गेले. त्यापैकीच सेवालाल महाराज हे एक होते. दिल्लीचा नवाब गुलाबखान महमद खान यांच्याशी सेवालाल महाराजांनी लढाई केली. विर सैनिक बदू, पुरा, हापा, उमला, वाघू, नंदू, खेमा आणि नाथा वडतिया इत्यादींचा समावेश या लढयात होता. गुलाब खानाच्या 9353 सैनिकांचा पराभव करुन सेवालाल महाराजांनी विजय संपादीत केला.
भारताच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा सदगुरु सेवालाल महाराज यांनी तयार केला होता. त्यावेळी उमाजी नाईक, तंट्या भिल्ल यासारखे धुरंदर त्यांच्या सोबतीला होते.

सेवालाल महाराज यांची शिकवण :-
“तम सोता तमार जीवनेमा
दीवो लगा सकोछो
कोई केनी भजो पूजो मत कोई केनी कमी छेई
सोतार वळक सोता करलीजो
भजेम वेळ घालो मत
करणी करेर सिको
मारी सिकवाडीपर ध्यान दीजो
जाळजो छाळजो पछ मानजो !’

सेवालाल महाराज हे दूरदृष्टी असलेले विचारवंत होते. समाजातील लोकांनी अंधश्रध्देमध्ये गुरफटून न जाता, स्वतःच्या मेहनतीच्या बळावर जीवन जगले पाहिजे. कोणत्याही गोष्टीवर डोळे बंद करुन विश्वास ठेवण्यापेक्षा त्या गोष्टीला जाणून, समजून, पारखून घेतल्यानंतरच विश्वास ठेवावे अशी त्यांची शिकवण होती.
समता, स्वातंत्र्य, बंधुत्व :-आपला विश्वासू पुतण्या जेतालाल यांचा विवाह सामका या अतिशय गरीब घराण्यातील मुलीशी करण्याचा निर्णय घेतला. आईचे छत्र हरवलेली तुकीया पवार याची काळी सावळी परंतू सर्वगुण संपन्न मेहनती मुलीशी सामका आणि राजवैभवात वाढलेला पुतण्या जेतालात यांचा विवाह सदगुरु सेवालाल महाराज यांनी घडवून आणने म्हणजे गरीबी व श्रीमंतीचा भेद संपविण्याचा हा आदर्श पायंडा होता. “कोरे गोरेन सायी हेयेस, नगरी वसतीन सायी हियेस जिव जळगाणिन साथी हियेस किडी मुंगीन सायी हियेस खूटा मुंगरीन सायी हियेस”
जीवन मुल्यांची शिकवण देण्यात सदगुरु सेवालाल महाराज यांनी आपली उभी हयात घालवली. याप्रकारे विश्वकल्याणाची संकल्पना जगाला देणारे सदगुरु सेवालाल महाराज गोर आणि कोर समाजाचे आदर्श ठरतात.
तत्वज्ञानी समाजशास्त्र :- किमान 250 वर्षापूर्वी, त्याकाळची प्रांत नैसर्गिम व सामाजिक परिस्थिती वाढती लोकसंख्या यांचा अभ्यास करुन संभाव्य परिस्थितीचा वेध घेत त्यांनी काढलेले अनुमान व तर्क आज खरे ठरलेले दिसत आहेत. 1) रपिया कटोरो पाळी वकजाय 2) रपियार तेर चंळा वकीय 3) गवा सोनेर सिंग वेजाय 4) बारा कोसेप दिवो बळीये 5) बेटा, बोडीर पटीये कोनी
सर्वसामान्यांचे नेतृत्व :-3755 गायीगुरांचे मालक, सोबत 52 तांडे सोबत घेऊन लदेणी करित भारतभर व्यापार करीत असत.
सदगुरु सेवालाल महाराज यांचा लदेणी मार्ग :-
“मध्य भारतेती निकळी,
पुणार दांडी सूरतेर तकत गाडी रहाळ गुजरात
बराण पुरेशे चोक उल्ली लाहोरोटो घेरो’

यावरुन हे सिध्द होते की, आज जे मोठे महामार्ग आहेत ते सर्व लदेणी व्यापार करतांना तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या देशाला मार्ग दाखवणारे तत्वज्ञानी म्हणून सदगुरु सेवालाल महाराज यांना म्हटले जाते.महाराष्ट्रातील रायगड जिल्हयातील ‘उरण’ तालुक्यात सेवा नावाचे गाव आज सुध्दा आहे. येथे सदगुरु सेवालाल महाराज यांचे ‘सेवापोर्ट’ हे बंदरगाह होते. येथून सदगुरु सेवालाल महाराज परदेशात व्यापार करीत असत. आता तेथे ‘जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट’ आहे.

धरमतरची खाडी :-सदगुरु सेवालाल महाराज यांच्या सहकार्याचे नाव ‘धर्मा’ हे होते. त्यावरुन रायगड जिल्हयातील ‘पेण’ तालुक्यातील ‘धरमतर’ खाडी म्हणून ओळखली जाते.

भाऊचा धक्का :-आज मुंबईतील जो भाऊचा धक्का आहे तो पूर्वी सेवालाल महाराजांच्या ताब्यात होता. या ठिकाणी पोर्तुगीजांचे जहाज समुद्रात अडकले होते. तेंव्हा सेवालाल महाराज आणि सहकार्यांनी तो जहाज समुद्रातून बाहेर काढले. त्याचे बक्षिस म्हणून झ्युरीच राजाने सेवालाल महाराज यांना मोत्यांची माळ दिली होती. म्हणून सेवालाल महाराज यांना ‘मोतीवाळो’ म्हणून सुध्दा ओळखतात.

पेण गागोदे :-
रायगड जिल्हयातील पेणपासून काही अंतरावर गागोदे गाव आहे. येथे सेवालाल महाराजांचे व्यापारी केंद्र होते. आज त्या ठिकाणी सेवालाल महाराजांचे मंदीर आहे.
“गोर गरीबेन दांडन खाये
ओरी सात पिढी नरकेन जाये’

सर्वसामान्य तळागाळातील लोकांबद्दल त्यांना खूप आत्मीयता, आपुलकी होती. समाजासाठीच त्यांनी ध्येयवेडे होऊन काम केले आणि संपूर्ण आयुष्य अविवाहीत राहिले. यावरुन हे सिध्द होते की, सेवालाल महाराज हे क्रांतीकारी सेनानी, व्यापारी आणि तर्कनिष्ठ विचारवंत होते.
या आधुनिक काळात त्यांनी आपल्याला दिलेली शिकवण, आत्मसाद करणे आणि त्यांनी दिलेल्या विचारांवर चालणे, हेच खऱ्या अर्थाने जयंती साजरी करणे होय.
मानवी इतिहासातील क्रांतीवीर आणि तर्कनिष्ठ विचारवंताचा मृत्यू 02 जाने. 1773 रोजी मु. रुईगड ता. मानोरा, जि. वाशिम येथे झाला.

-डॉ. राजेश शंकरराव चव्हाण
चिंतामणी हॉस्पीटल, भावसार चौक, नांदेड
मो.क्र. : 9423441237

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *